ऋषी कपूर यांनी उलगडलं केसांच्या रंगाचं कोडं
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांच्यावर सध्या अमेरिकेमध्ये वैद्यकीय उपचार सुरु आहेत. ऋषी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट करुन वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होत असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चा होतांना दिसून येत आहे. यात ऋषी कपूर यांच्या केसांच्या रंगावरुन अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.
सध्या सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्या केसांचा रंग पांढरा झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कदाचित उपचारामुळे त्यांच्या केसांचा रंग पांढरा झाल्याची चर्चा रंगली होती. परंतु ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केसांच्या पांढऱ्या रंगाविषयी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी एक फोटो शेअर केला असून ते चित्रपटातील लूकमध्ये दिसून येत आहेत.
‘माझे केस कोणत्याही आजारामुळे पांढरे झाले नसून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी केसांचा रंग बदलला आहे. मी लवकरच हितेश भाटिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती हनी त्रेहान करत आहेत’, असं ऋषी कपूर यांनी सांगितलं.
दरम्यान, ऋषी कपूर २९ सप्टेंबर रोजी अमेरिकेला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी अभिनेत्री सोनाली ब्रेद्रेंची भेट घेतली. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच अभिनेता अनुपम खेर यांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती.