ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उसाला एफआरपीच्या वर २०० रुपये अधिक देण्याची मागणी

  • उसाला एफआरपीच्या वर २०० रुपये अधिक देण्याची मागणी

उसाला एफआरपी अधिक २०० रुपये दिल्याविना कारखाने सुरू करू देणार नाही, याबरोबरच या मागणीसाठी ११ नोव्हेंबर रोजी सांगलीसह सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हय़ांत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बठकीत दिली. दरम्यान, मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयावर ऊस आंदोलनातून दगडफेक करण्यात आली.

खा. शेट्टी यांनी सांगितले, की या सरकारला प्रश्न मिटवायचा आहे असे वाटत नसावे. कारण गेल्या हंगामामध्ये मध्यस्थी करणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे गतहंगामातील एफआरपी चुकविणारे कारखाने यंदा सुरू करण्यात येत आहेत  या संदर्भात बोलण्यास तयार नाहीत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारणानगर येथे झालेल्या परिषदेत एफआरपी अधिक २०० रुपये ऊस उत्पादकांना मिळाले पाहिजेत असे सांगत असताना  महसूलमंत्री मात्र एफआरपी देणाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊन कारखाने सुरू करण्यास सांगत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्दच संघटनेने मान्य केला असून, ही रक्कमही ऊस उत्पादकांना मिळू नये असे काही मंडळींना वाटत आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही गतहंगामातील देणे दिलेले नाही. तसेच  शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज काढून फसवणूक केली आहे. अशा मंडळींकडून न्यायाची अपेक्षा तरी कशी धरावी?

ऊस परिषदेत मागणी केल्याप्रमाणे एफआरपी अधिक २०० रुपये मिळाल्याविना आम्ही उत्पादित केलेला ऊस देणार नाही, कारखानेही सुरू करू देणार नाही. या मागणीसाठी ११ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा बंद चार  जिल्हय़ांत पाळणार असून, या दिवशी एकही वाहन रस्त्यावर फिरू देणार नाही. सरकारला रक्तपात करण्याची इच्छा दिसत असून यानंतर होणाऱ्या गंभीर परिणामांना सरकारच जबाबदार राहील.

जिल्हाधिकारी कार्यालयावर  दगडफेक

दरम्यान, काल रात्री नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये एका खिडकीची काच फुटली असून यानंतर जिल्हाधिकारी  कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्यात आले.  या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दगडफेकीची जबाबदारी स्वाभिमानीसह रघुनाथ पाटील यांच्या संघटनेने घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button