breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उत्तर भारतीयांच्या सभेतही राज यांची मराठी अस्मिता

उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आपली प्रादेशिक अस्मितेची भूमिका मांडली. तुमच्या राज्याचा विकास न करणाऱ्या नेत्यांना जाब विचारा, असे बजावत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा उत्कर्ष साधणे हेच माझे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेत्यांनी जास्तीतजास्त काळ देशावर राज्य केले. मात्र तुम्हाला नोकरी-व्यवसायासाठी महाराष्ट्र किंवा अन्य राज्यांत जावे लागते. तेथे अनेकदा अपमानित व्हावे लागते याचा विचार तुम्हीच करा, असे आवाहनही राज यांनी उत्तर भारतीयांना केले.  परप्रांतीयांना राज ठाकरे यांच्या असलेल्या विरोधामागे नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी उत्तर भारतीय महापंचायतन संघाने राज ठाकरे यांना कांदिवली येथे उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर आमंत्रित केले होते.

राज  यांनी जाणीवपूर्वक हिंदीमध्ये भाषण करत असल्याचे सुरुवातीलाच सांगितले. या देशाची घटना, कायदे व नियम समजून घेतले तर माझी भूमिका तुम्हाला समजू शकेल असे त्यांनी सांगितले. घटनेने कोणीही कोठेही जाऊ शकतो, परंतु कोठेही व कसेही राहू शकत नाही. यासाठी प्रथम कायदा समजून घ्या. तुम्ही एखाद्या राज्यात गेल्यास तेथील पोलिसांना तुम्ही कशासाठी आला व कोठे काम करणार हे सांगणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात आज झारखंड, बिहार व उत्तर प्रदेशमधून रोज ३८ रेल्वे गाडय़ा भरून माणसे येतात आणि रिकाम्या गाडय़ा परत जातात. महाराष्ट्रात त्यातही मुंबईची क्षमता लक्षात घेता आता तुम्हीच तुमच्या लोकांना येथे येण्यापासून रोखा असेही राज यांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी लोकांनाच प्रथम काम मिळाले पाहिजे त्यानंतरच अन्य लोकांचा विचार होऊ शकतो. उद्या तुमच्या राज्यात जर तुमच्या लोकांना काम न देता अन्य राज्यांतील लोकांना काम दिले तर संघर्ष होणारच ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  महाराष्ट्रातील रेल्वे भरतीची जाहिरात महाराष्ट्रात न होता उत्तर प्रदेश व बिहारमध्ये होणार असेल तर ते कोण सहन करणार असा सवाल करून टॅक्सी चालकांनीही महिलांबाबत असभ्य भाषा वापरल्यामुळेच मनसैनिकांनी झटका दिल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button