breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘ईव्हीएम’विरोधातील खोट्या तक्रारींची ‘ऑन द स्पॉट’ पडताळणी

पुणे –  इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) शंका घेऊन मतदाराने आपल्या पसंतीच्या उमेदवाराऐवजी दुसऱ्या उमेदवाराला मत गेल्याची तक्रार केल्यास हा प्रकार संबंधिताला चांगलाच महागात पडणार आहे. असा प्रकार घडल्यास मतदाराकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन पोलिस आणि राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्याला पुन्हा मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे…मात्र, त्या मतदानाच्यावेळी ‘व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल’वर (व्हीव्हीपॅट) सात सेकंद दिसणाऱ्या चिठ्ठीत पसंतीच्या उमेदवारालाच मत मिळाल्याचे दिसल्यास संबंधिताला सहा महिने तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

‘ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित करण्यात येत असल्याने यंदा प्रथमच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर केला जाणार आहे. त्यावर मतदाराने मत दिल्यानंतर आपल्याच पसंतीच्या उमेदवारला मत मिळाले की नाही, हे समजण्यासाठी सात सेकंदांपर्यंत चिठ्ठी दिसणार आहे. या चिठ्ठीमध्ये उमेदवाराचे नाव आणि चिन्ह असणार आहे. त्यामुळे मतदाराला आपण दिलेले मत योग्य उमेदवाराला गेल्याची खात्री पटणार आहे. मात्र, तरीही एखाद्याने आपण दिलेले मत भलत्याच उमेदवाराला गेल्याची तक्रार केल्यास त्यावरही तोडगा काढण्यात आला आहे. अशावेळी मतदान केंद्राध्यक्षांनी कोणती कार्यवाही करायची, याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

मतदाराने आपले मत पसंतीच्या उमेदवाराला न पडता भलत्याच उमेदवाराला जात असल्याची तक्रार केल्यास मतदान केंद्राध्यक्ष संबंधितांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतील. त्याचा छापील नमुना केंद्राध्यक्षांकडे राहणार आहे. त्यानंतर संबंधिताकडून दोन रुपये वसूल करून पावती मतदाराला दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधित मतदान केंद्रातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्यासमोर मतदाराला पुन्हा एकदा मतदानाची संधी दिली जाणार आहे. त्या वेळी पहिल्यांदा मतदान केलेल्याच उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी ‘व्हीव्हीपॅट’वर दिसल्यास ‘ईव्हीएम’ कोणताही बिघाड नसल्याचे स्पष्ट होणार आहे. मात्र, विनाकारण वेळ घालविल्याबद्दल संबंधित मतदारावर फौजदारी कारवाई करून त्याला अटक केली जाणार आहे. असे कृत्य करणाऱ्याला किमान सहा महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मतदाराने ‘ईव्हीएम’बाबत केलेली तक्रार खोटी ठरल्यास ती महागात ठरण्याची शक्यता आहे. मात्र, मतदाराची तक्रार योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर संबंधित केंद्रातील मतदान प्रक्रिया थांबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदाराकडून घेण्यात आलेले दोन रुपयेही परत दिले जाणार आहे. तक्रार करणाऱ्याने दुसऱ्यांदा केलेल्या मतदानाची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

एखाद्या मतदाराने ईव्हीएमवरील बॅलेट युनिटवरील बटण दाबल्यानंतर मत भलत्याच उमेदवारला गेल्याची तक्रार केल्यास त्याला पुन्हा एकदा मतदानाची संधी (टेस्ट व्होट) दिली जाईल. तत्पूर्वी त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. तक्रार खोटी असल्याचे आढळल्यास त्या मतदाराविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. तक्रार खरी असल्यास संबंधित मतदान केंद्रातील मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात येईल.

– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button