breaking-newsक्रिडा

इंडीयन सुपर लीगच्या नव्या हंगामाची सुरुवात आज पासून

  • एटीके आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात पहिला सामना

कोलकाता– हिरो इंडियन सुपर लिगला 2014 मध्ये प्रारंभ झाल्यापासून एटीके आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात अनेक महत्त्वाच्या लढती झाल्या आहेत. चार वर्षे आणि स्पर्धेचे चार अध्याय झाले तरी त्यांच्यातील लढतीचे थोडेसे नावीन्य कायम आहे.

या दोन संघांमध्ये अंतिम फेरीचे दोन सामने रंगले आहेत. यात पहिल्या स्पर्धेत निर्णायक मुकाबला झाला. त्यानंतर 2016 मध्ये ब्लास्टर्सच्या होमग्राऊंडवर तुडुंब गर्दी केलेल्या प्रेक्षकांच्या साक्षीने दुसरी अंतिम फेरी रंगली. या दोन संघांत सलामीची लढत गेल्या मोसमातही झाली होती. आता पाचव्या हिरो आयएसएलमध्ये हे दोन संघ शनिवारी आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले असताना कमालीची उत्कंठा आहे.

एटीके दोन वेळचा विजेता आहे. ब्लास्टर्सविरुद्ध त्यांची कामगिरी पाच विजय आणि एक पराभव अशी आहे. यानंतरही विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर यजमान संघ उतरेल तेव्हा त्यांच्यावरही थोडेसे दडपण असेल. गेल्या मोसमात एटीकेचे बाद फेरीतील स्थान हुकले. त्यानंतर त्यांनी अनेक नवे खेळाडू करारबद्ध केले आहेत. यातील अनेकांनी आधीच्या आयएसएलमध्ये लक्षवेधी कामगिरी करून दाखविली आहे. एटीके नव्या मोसमात नव्या निर्धाराने सहभागी होत असल्याचे यातून स्पष्ट होते. कालू उचे, एव्हर्टन सँटोस, गेर्सन व्हिएरा आणि मॅन्युएल लँझरॉत अशा परदेशी खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाविषयी चाहत्यांच्या अपेक्षा सुद्धा उंचावल्या आहेत यात नवल नाही.

नवे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, गेल्या दोन मोसमांत मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावतील असे खेळाडू माझ्याकडे कदाचित नव्हते. यावेळी मात्र लँझरॉत, एव्हर्टन, कालू आणि बलवंत सिंग यांच्याकडे अशी क्षमता आहे. त्यांनी संधी निर्माण करावी म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, पण अखेरीस संघाचे संतुलन साधणे महत्त्वाचे असेल.कॉप्पेल यांनी 2016 मध्ये ब्लास्टर्सला अंतिम फेरी गाठून दिली. योगायोगाने त्यांचा एटीकेविरुद्ध पराभव झाला.

त्यांच्या प्रतिस्पर्धी संघात महत्त्वाच्या पदाची सुत्रे डेव्हिड जेम्स या परिचीत व्यक्तीकडे आहेत. इंग्लंडचे ते माजी गोलरक्षक आहेत. त्यांना एटीके-ब्लास्टर्स यांच्यातील चुरशीचा अनुभव आहे, कारण पहिल्या आयएसएल अंतिम सामन्याच्यावेळी ते खेळाडू-प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिकेत होते. लिव्हरपूलचे माजी गोलरक्षक असलेल्या जेम्स यांनी ही झुंज जवळून पाहिली असून आयएसएलमधील हे सर्वाधिक कट्टर प्रतिस्पर्धी असल्याचे त्यांना वाटते.

जेम्स यांनी सांगितले की, ब्लास्टर्स विरुद्ध एटीके हे सर्वाधिक कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघांनी दोन वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. दोन्ही वेळा लढती चुरशीच्या झाल्या. अर्थातच वर्चस्वासाठी एटीकेचे पारडे जड असते. साखळी टप्प्यात सर्वाधिक गर्दी होणारी ही लढत आहे. ही लिगची केवळ सुरवात आहे. जेम्स यांनी म्हटल्याप्रमाणे एटीकेविरुद्ध जिंकण्याची आमची इच्छा असली तरी एका लढतीवरून संपूर्ण मोसमाचे भवितव्य ठरणार नाही.

ब्लास्टर्सला या लढतीत भारतीय बचावपटू अनास एडाथोडिका याला मुकावे लागेल. त्याच्यावर तीन सामन्यांची बंदी आहे. अशावेळी बचावाची मदार संदेश झिंगन आणि कंपनीवर असेल. त्यातून कालू आणि लँझरॉत अशा गोलची संधी आणि क्षमता सिद्ध केलेल्या स्ट्रायकर्ससमोर त्यांची कसोटी लागेल.

ब्लास्टर्सनेही आपला संघ बळकट केला आहे. मॅटेज पॉप्लॅट्निक आणि स्लावीसा स्टोजानोविच असे खेळाडू नव्या लीगशी पटकन जुळवून घेतील आणि आघाडी फळीत आवश्यक अशा ताकदीची भर घालतील अशी जेम्स यांना आशा असेल. मागील मोसमात ब्लास्टर्स याच बाबतीत कमी पडले होते.

युगांडाचा स्टार केझीरॉन किझीटो आणि घानाचा विंगर करेज पेकूसन हे स्टायकर्सना पाठबळ देण्याची अपेक्षा आहे. जेम्स यांनी सांगितले की, नव्या खेळाडूंची भरती महत्त्वाची होती. फार दिग्गज नसलेले पण सर्वोत्तम खेळाडू आम्ही मिळवू शकतो. संघासाठी उत्तम ठरणारे चांगले खेळाडू आम्ही घेतले आहेत. मोसमपूर्व तयारीत संघात निर्माण झालेला समन्वय फार छान आहे.

दोन्ही संघांकडे इतकी क्षमता असल्यामुळे मागील मोसमाच्या तुलनेत वेगळा निकाल अपेक्षित आहे. त्यावेळी गोलशून्य बरोबरी झाली होती. यावेळी अखेरच्या मिनिटापर्यंत झुंजार खेळ अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button