breaking-newsक्रिडा

इंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा: निकोलाच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचा ब्लास्टर्सला धक्का

कोची– हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमातील बहुचर्चित लढतीत संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने दक्षिणेतील कट्टर प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्सला 2-1 असे हरविले. प्रतीस्पर्धी कर्णधार सुनील छेत्रीच्या गोलमुळे पिछाडीवर पडलेल्या ब्लास्टर्सला स्लावीस्ला स्टोयानोविच याने पेनल्टी सत्कारणी लावत बरोबरी साधून दिली होती. नऊ मिनिटे बाकी असताना निकोला क्रॅमरेविच याच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूने ब्लास्टर्सला धक्का दिला. गतउपविजेत्या बेंगळुरूने याबरोबरच गुणतक्त्‌यात आघाडीवर झेप घेतली.

बेंगळुरूने तीन संघांना मागे टाकले. बेंगळुरूने पाच सामन्यांत चौथा विजय मिळविला. त्यांनी एक बरोबरी साधली आहे. त्यांनी अपराजित मालिका राखली आहे. आता दुसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीचे सात सामन्यांतून 11, तिसऱ्या क्रमांकावरील नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचे 5 सामन्यांतून 11, तर चौथ्या स्थानावर गेलेल्या एफसी गोवाचे पाच सामन्यांतून दहा गुण आहेत. ब्लास्टर्सला सहा सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. एक विजय व चार बरोबरींमुळे सात गुणांसह त्यांचे सहावे स्थान कायम राहिले. आतापर्यंत बेंगळुरू, जमशेजदपूर आणि नॉर्थइस्ट असे तीन संघ अपराजित आहेत.

नऊ मिनिटे बाकी असताना मिकूने स्पेनचा बदली सहकारी झिको हर्नांडेझ याला पास दिला. झिकोचा फटका ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमार याने चांगला थोपविला, पण काही कळायच्या आत चेंडू ब्लास्टर्सच्या निकोला क्रॅमरेविच याच्यापाशी पडला आणि त्याच्या पोटाला लागून नेटमध्ये गेला. ब्लास्टर्ससाठी हा स्वयंगोल दुर्दैवी ठरला.
17व्या मिनिटाला छेत्री-मिकू जोडीने आपली जादू दाखविली. मिकूने दिर्घ आणि ताकदवान पास दिला. तोपर्यंत चेंडूचा अचूक अंदाज घेत छेत्रीने ब्लास्टर्सच्या बचाव फळीच्या मागून धावण्याचे डावपेच लढविले. संदेश झिंगन त्याच्या बरोबरीने धावत मार्किंगचा प्रयत्न करीत होता, पण छेत्रीची चपळाई आणि कौशल्य सरस ठरले. झिंगनने घोट्यापाशी धक्का मारूनही छेत्रीने तोल सावरत चेंडू नेटमध्ये घालविला.

ब्लास्टर्सला 28व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. साहल अब्दुल समादने बॉक्‍समध्ये मुसंडी मारली. त्याची चाल धोकादयक ठरण्याची चिन्हे दिसत असतानाच बेंगळुरूच्या निशू कुमारने त्याला पाडले. मग पंच आर. वेंकटेश यांनी एकाही सेकंदाचा विलंब न लावता ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल केली. स्टोयानोविच याने वरून मारलेला चेंडू बारला लागून नेटमध्ये गेला. त्यावेळी बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही गोल रोखू शकला नाही.
सामन्याची सुरवात अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक झाली. पहिली संधी ब्लास्टर्सने निर्माण केली. के. प्रशांत याने सी. के. विनीत याला बॉक्‍समध्ये मैदानालगत क्रॉस पास दिला. प्रशांतने डाव्या पायाने मारलेला फटका मात्र क्रॉसबारवरून गेला. पाचव्या मिनिटाला बेंगळुरूला फ्री किक मिळाली.

डिमास डेल्गाडो याचा प्रतिस्पर्ध्याने रोखलेला चेंडू उजव्या बाजूला एरीक पार्टालू याच्यापाशी गेला. त्याने उजव्या पायाने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमार याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. नवव्या मिनिटाला समादने मध्य क्षेत्रात मोकळीक मिळताच स्टोयानोविच याला पास दिला, पण त्याने जास्त ताकद वापरली आणि गुरप्रीतने पुढे झेपावत फटका रोखला.

21व्या मिनिटाला विनीतने उजवीकडून मैदानालगत अप्रतिम क्रॉस पास दिल्यानंतर चेंडू नेटसमोरील सैमीनलेन डुंगल याच्यापाशी गेला. त्याचवेळी बेंगळुरूचा बचावपटू राहुल भेके याने चुरशीने धावत दडपण आणले. परिणामी डुंगलने मारलेला चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला. दोन मिनिटांनी प्रशांतने उजवीकडून मुसंडी मारली आणि त्याने डाव्या पायाने किक मारली. गुरप्रीतने डावीकडे वाकत चेंडू नेटपासून बाजूला घालविला.

पुर्वार्धाच्या अंतिम टप्यातही चुरस झाली. मिकूने ब्लास्टर्सच्या नेमांजा लॅकिच-पेसिच याला दाद लागू दिली नाही. त्याने उजवीकडून घोडदौड करीत फटका मारला. नवीन झेपावला, पण चेंडू क्रॉसबारवरून गेला. 41व्या मिनिटाला डुंगलने चेंडूवर ताबा मिळवित सुमारे 30 यार्डावरून फटका मारला, पण अचूकतेअभावी चेंडू क्रॉसबारवरून गेला.

निकाल :
केरळा ब्लास्टर्स एफसी : 1 (स्लावीस्ला स्टोयानोविच 30-पेनल्टी) पराभूत विरुद्ध
बेंगळुरू एफसी : 2 (सुनील छेत्री 17, निकोला क्रॅमरेविच 81-स्वयंगोल)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button