breaking-newsक्रिडा

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: खराब खेळामुळे दिल्लीचा मुंबई विरुद्ध पराभव

दिल्ली– हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दिल्ली डायनॅमोजला मध्यंतरास एका गोलच्या आघाडीनंतरही पेनल्टी आणि स्वयंगोल केल्याने मुंबई सिटी एफसीविरुद्ध 2-4 असा पराभव स्विकारावा लागला. मुंबईचे सर्व चार गोल दुसऱ्या सत्रात झाले. मुंबईने सामन्यात मिळवलेल्या दमदार विजयामुळे गुणतक्त्‌यात चौथ्या स्थानावर झेप घेतली.

लालियनझुला छांगटेने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला गोल करत दिल्लीचे खाते उघडले. यानंतर पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. तर, दुसऱ्या सत्रात तब्बल पाच गोल झळकावले गेले. यात मुंबईच्या रफाएल बॅस्तोसने पेनल्टीवर बरोबरी साधली. त्यानंतर दिल्लीच्या मार्टी क्रेस्पीकडून स्वयंगोल झाला. जियान्नी झुईवर्लून याने दिल्लीला बरोबरी साधून दिली होती. मग मुंबईकडून रेनीयर फर्नांडिस आणि कर्णधार पाऊलो मॅचादो यांनी गोल केले.

दिल्लीचे खाते नाट्यमय पद्धतीने उघडले. तिसऱ्या मिनिटाला मार्कोस टेबारने चेंडूवर ताबा मिळवित बॉक्‍समध्ये प्रवेश करत छांगटेला पास दिला. छांगटेने मारलेला चेंडू सौविक चक्रवर्तीला लागून नेटमध्ये गेला आणि दिल्लीचे खाते उघडले. यानंतर संपुर्न सत्र दोन्ही संघांनी प्रय्त्न करुन एकही गोल झाला नाही.

मुंबईने उत्तरार्धाची सुरवात सकरात्मक केली. 47व्या मिनिटाला त्यांनी गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. यानंतर पुढच्या पुढच्याच मिनिटात दिल्लीच्या प्रीतम कोटल याने चेंडू हाताळला. हे पंच रक्तीम साहा यांनी पाहिले. त्यांनी मुंबईला तातडीने पेनल्टी बहाल केली. त्यावर बॅस्तोसने नेटच्या उजव्या कोपऱ्यात वरील बाजूला चेंडू अचूक मारला. आणि त्यांचे खाते उघडून दिले.

मुंबईला पेनल्टीनंतर स्वयंगोलचा लाभ झाला. छोट्या पासेसनंतर बॅस्तोसकडे चेंडू आला. त्याने मारलेला चेंडू मार्टी क्रेस्पीच्या डोक्‍याला लागून हवेत गेला. त्यावेळी दिल्लीचा गोलरक्षक गोम्स गोंधळात पडला. त्याला काही कळायच्या आत चेंडू त्याच्या वरून नेटमध्ये गेला व क्रेस्पीच्या नावावरील स्वयंगोल मुंबईच्या खात्यात जमा झाला. याबे मुंबईला 2-1 अशी आघाडी मिळाली.

यानंतर पुढच्या तीन मिनिटांतच दिल्लीने पिछाडी कमी केली. रेने मिहेलिच याने घेतलेल्या फ्री किकवर जियान्नी झुईवर्लून याने हेडींगवर चेंडू नेटच्या कोपऱ्यात मारत गोल केला. यानंतर मुंबईने आक्रमण केले. बॅस्तोसने चाल रचत पाऊलो मॅचादोला डावीकडे पास दिला. मॅचादोने रेनीयर फर्नांडीस याच्याकडे चेंडू सोपविला. रेनीयरने मग पहिल्या प्रयत्नात नेटच्या डाव्या कोपऱ्यात मारत सुंदर गोल करत पुन्हा मुंबईला आघाडी मिळवून दिली.

तर, सामना संपायला दहा मिनिटे बाकी असताना मुंबईने चौथा गोल केला. अरनॉल्ड इसोकोने उजवीकडून चाल रचली. त्याने मॅचादोला पास दिला. मग मॅचादोने उरलेले काम चोखपणे पार पाडत लक्ष्य साधले. व मुंबईला विजय मिळवून दिला.

मुंबईने नऊ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून दोन बरोबरी व दोन पराभवांसह त्यांचे 17 गुण झाले. मुंबईने जमशेदपूर एफसी (10 सामन्यांतून 15) व एटीके (10 सामन्यांतून 15) यांना मागे टाकले. त्यामुळे सहा वरून त्यांना दोन क्रमांक प्रगती करता आली. एफसी गोवा संघाचेही 17 गुण आहेत, पण गोव्याचा 8 (22-14) गोलफरक मुंबईच्या एकापेक्षा (11-10) सरस आहे. बेंगळुरू एफसी 22 गुणांसह आघाडीवर असून नॉर्थइस्ट युनायटेड एफसी 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम राहिली. 10 सामन्यांत त्यांना सहावा पराभव पत्करावा लागला. चार बरोबरीच्या चार गुणांसह त्यांचा तळात दहावा क्रमांक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button