breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

आवाससाठी शासकीय जमिनींची चाचपणी; प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

पुणे (महा ई न्यूज) – प्रत्‍येक माणसाला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्‍यात आली आहे. हा शासनाचा महत्‍त्‍वांकाक्षी कार्यक्रम असून ही योजना यशस्‍वी करण्‍यासाठी ज्‍यांना स्‍वत:ची जागा नाही, त्‍यांना शासकीय जमीन उपलब्‍ध करुन द्यावी लागणार आहे. संबंधित गट विकास अधिकारी, तहसिलदार यांनी त्‍याबाबतचे प्रस्‍ताव येत्‍या आठ दिवसांत सादर करावेत, असे आदेश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्‍हाधिकारी जयश्री कटारे, जिल्‍हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी उपस्थित होते.

 

मुख्‍यमंत्री फडणवीस येत्‍या 3 आक्‍टोबरपासून शासनाच्‍या काही महत्‍त्‍वाकांक्षी योजनांचा जिल्‍हास्‍तरावर आढावा घेणार आहेत. यासाठी जिल्‍हा आणि विभागनिहाय समित्‍या गठीत करण्‍यात येणार असून अपर मुख्‍य सचिव (गृहनिर्माण), सामाजिक न्‍याय विभागाचे सचिव, ग्रामविकासचे सचिव आणि मेडाचे महासंचालक हे पुणे जिल्‍ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्‍हापूरचा आढावा घेतील. या समित्‍या जिल्‍ह्यातील प्रत्‍येक योजनेच्‍या सद्यस्थितीत असलेल्‍या प्रगतीची आकडेवारीनिहाय माहिती संकलित करुन पुढील सहा महिन्‍यांच्‍या कालावधीत योजनांची फलनिष्‍पत्‍ती साध्‍य करण्‍यासाठी पाठपुरावा करेल. त्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राम यांनी आढावा बैठक घेतली.

 

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही ग्रामीण भागातील गरीब माणसाला घरकूल मिळवून देण्‍यासाठी सुवर्णसंधी असून संबंधित गटविकास अधिकारी, तहसिलदार यांनी समन्‍वयाने काम करुन विहीत नमुन्‍यातील प्रस्‍ताव मोजणीसह इतर सर्व बाबींची पूर्तता करुन पाठवावे, असे निर्देश जिल्‍हाधिकारी राम यांनी दिले. प्रांताधिका-यांनी येत्‍या तीन दिवसात या संदर्भात बैठक घेऊन त्‍याचा पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्‍यांनी दिल्‍या. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) राबविण्‍याबाबत नगरपालिकांच्‍या मुख्‍याधिका-यांनी सकारात्‍मक भूमिका घेऊन कार्यवाही करावी, असे ते म्‍हणाले.

 

जलयुक्‍त शिवार, महानरेगा, धडक विहीर योजना, शेततळे आदींबाबत झालेली कार्यवाही, मुख्‍यमंत्री ग्रामीण पेय जलयोजना, राष्‍ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा विकास प्रकल्‍पाचीही बैठकीत माहिती घेण्‍यात आली. मुख्‍यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जिल्‍ह्याचे उद्दिष्‍ट, पूर्ण झालेले काम, प्रगती पथावर असलेले काम, दलित वस्‍ती सुधारयोजना, ठक्‍करबाप्‍पा योजना, प्रधानमंत्रीकृषी सिंचन योजना आदींचा आढावा घेण्‍यात आला.

 

जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्‍ह्यातील कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने माहिती सादर केली. सातारा जिल्‍ह्यात सरकारी पंच उपलब्‍ध व्‍हावेत यासाठी नियमबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍यात आला होता. तसाच कार्यक्रम पुणे जिल्‍ह्यात करावा, अशी सूचना त्यांनी केली. न्‍यायालयात पंच ‘होस्‍टाईल’ झाल्‍यामुळे पुरावा टिकत नाही आणि गुन्‍हे सामितीचे प्रमाण कमी होते, त्‍यासाठी सरकारी पंच असण्‍यावर त्‍यांनी भर दिला. शाळा-महाविद्यालयांमध्‍ये विद्यार्थिनी सुरक्षा समिती, महिला सुरक्षा समिती स्‍थापन करण्‍यात आल्‍या असून अत्‍याचारासंबंधीच्‍या तक्रारी संबंधित पोलीस स्‍थानकाकडे पाठवाव्‍यात असे आवाहनही त्‍यांनी केले. वाहतूक व त्‍यासंदर्भातील समस्‍या सोडविण्‍याची गरज असून नगरपालिकांनी रस्‍त्‍यावरील अतिक्रमणे, पार्कींगची सुविधा,रस्‍त्‍यावरील पांढरे पट्टे, आवश्‍यक तेथे सीसीटीव्‍ही कॅमेरे आदींची व्‍यवस्‍था करावी, असे ते म्‍हणाले. प्रत्‍येक गावाचा वाहतूक आराखडा असतो, मात्र त्याची योग्‍य पध्‍दतीने अंमलबजावणी झाली तर ते सर्वांच्‍याच हिताचे असते, असेही ते म्‍हणाले.

 

जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि सहायक जिल्‍हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही बैठकीच्‍या अनुषंगाने आवश्‍यक त्‍या सूचना केल्‍या. बैठकीस गटविकास अधिकारी,नगर पालिकांचे मुख्‍याधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button