breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आयआयटी ‘टेक फेस्ट’ आजपासून

नोबेल विजेते दलाई लामा यांची उपस्थिती

आशियातील सर्वात मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टला शुक्रवार, १४ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. यंदा महोत्सवाचे हिरकमहोत्सवी वर्ष असून यानिमित्त नोबेल विजेते बौद्ध धर्मगुरू दलाई लामा उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञानातील सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने हा महोत्सव भरविण्यात येतो. शुक्रवार, १३ ते रविवार १५ डिसेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पवईच्या आयआयटी परिसरात सकाळी नऊ वा. होईल. या वेळी दलाई लामा यांचे व्याख्यान होणार आहे. या महोत्सवात केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य, जागतिक बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ शांता देवराजन, टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय विजयन आदी उपस्थित राहणार आहेत.

सर्जनशील प्रयोगांचे प्रदर्शन, स्पर्धा, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल महोत्सवात आहे. यंदा दहा हजार विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यातील ५०० स्पर्धक आंतरराष्ट्रीय आहेत. दीड लाखांहून अधिक लोक या प्रदर्शनाला भेट देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

माणसांशी संवाद साधणारा यंत्रमानव

रोबो म्हणजे यंत्रमानव सर्वानाच आकर्षित करतो. महोत्सवात अनेक देशांतील यंत्रमानव, त्यांच्या करामती आणि कौशल्ये पाहता येतील. अमेरिका, स्वीडन, इराण, ब्राझिल, मेक्सिको आणि रशियातील यंत्रमानव दाखलही झाले आहेत. माणसांशी  संवाद साधणारा स्वीडनमधील यंत्रमानव आणि वेटरचे काम करणारा अमेरिकेतील यंत्रममानव हे यंदाचे आकर्षण आहे. जर्मनहून येणारे सॉकर प्लेयर रोबोट पथकही लक्षवेधी ठरणार आहे. आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थानी बनवलेले पाण्यातील अशुद्ध कण ओळखणारे यंत्र, बॉम्बशोधक वाहन, डोंगराळ भागात वापरल्या जाणाऱ्या हलक्या पालख्या या महोत्सवात पाहता येतील.

तंत्रज्ञान आणि मानवता एकत्र यावी. यंत्र घडवणाऱ्यांना मानवी गरजा, वृत्ती समजावी तसेच विद्यार्थ्यांना तणावमुक्तीसाठी, प्रेरणा मिळावी या दृष्टीने दलाई लामा यांना आमंत्रित करण्यात आले आहे.   – प्रा. सोम्य मुखर्जी, अधिष्ठाता, आयआयटी, मुंबई

मला भारत खूप आवडतो. येथील विविधतेबद्दल खूप ऐकले आहे. आयआयटीच्या टेक फेस्टमध्ये मी बनवलेल्या रोबोचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे.     – सिंना होजोबोटीन, रशियन विद्यार्थी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button