breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आमदार लांडगेंचे उत्तराधिकारी भैय्यासाहेब?

– कामगार नेते सचिन लांडगे पुन्हा सक्रीय
– वाढदिनानिमित्त सोशल मीडियावर ‘ब्रँडिंग’
पिंपरी – २०१४ मध्ये झालेली विधानसभा आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीत भोसरीत एकहाती सत्ता राखणारे आमदार महेश लांडगे यांचा उत्तराधिकरी म्हणून कामगार नेते सचिन लांडगे यांचा चेहरा आता समोर येवू लागला आहे. वाढदिनानिमित्त ‘सोशल मीडिया’वर ‘भैय्यासाहेब’ यांच्या समर्थकांनी तुफान ‘ब्रँडिंग’ सुरू केले आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी शिरुरच्या लढाईची तयारी केली, तर भोसरीच्या गडावर ‘भैय्यासाहेब’ यांना ‘गडकरी’ होण्याची संधी मिळणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ‘कमळ’ फुलविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड मुसंडी मारली. त्यामध्ये भोसरीतून आमदार महेश लांडगे यांनी एकहाती बाजी मारली. मात्र,  आमदार लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे यांना अवघ्या ३०० मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘भोसरीत भाजपचा गड आला, पण सिंह गेला’ अशी स्थिती निर्माण झाली होती. याची सल अद्यापही आमदार लांडगे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कायम आहे.
विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विलास लांडे यांचा ‘शिलेदार’ असलेल्या अजित गव्‍हाणे यांनी सचिन लांडगे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे सचिन लांडगे यांना पुन्हा राजकीय पटलावर आणण्यासाठी आमदार लांडगे समर्थकांनी आटापीटा सुरू केला आहे. त्यातच माजी आमदार विलास लांडे यांनीही अजित गव्‍हाणे यांना ताकदीने पाठबळ देण्यास सुरूवात केली आहे.
कारण, भारतीय जनता पक्षाकडून शिरुर लोकसभेसाठी आमदार लांडगे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. असे झाल्यास आमदार लांडगे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोसरीतूनच माजी आमदार लांडे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून माजी आमदार विलास लांडे यांना शिरुर लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर भोसरीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अजित गव्‍हाणे यांना रिंगणात उतरण्याकरिता माजी आमदार लांडे प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. तसेच, आमदार लांडगे यांना आव्‍हाण देण्यासाठी अजित गव्‍हाणे यांनीही शड्डू ठोकण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच आमदार लांडगे आणि सचिन लांडगे यांच्या समर्थकांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे ‘ब्रँडिंग’ सुरू केले आहे.
————
विधानसभा निवडणुकीची तयारी…
कामगार नेते सचिन लांडगे यांना भोसरीत ‘भैय्या’ म्हणून ओळखले जाते. महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढता यावा. तसेच, अजित गव्‍हाणे यांना राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर भाजपकडून सचिन लांडगे यांना रिंगणात उतरवले जाणार आहे. कारण, भोसरीतील आजवरची राजकीय स्थित्यंतरे पाहता गाववालाच गाववाल्यांना भारी पडतो, असा अनुभव आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे समर्थकांनी सचिन लांडगे यांना ‘सोशल मीडिया’वर उचलून धरले आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण भोसरी विधानसभा मतदार संघात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button