breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आ. जगतापांच्या राजकीय विद्यापीठात अभूतपूर्व शांतता; कुलगुरूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

  • माजी आमदार विलास लांडे यांचे मौन कायम
  • शिरूर लोकसभा लढण्याबाबत भूमिका अनिश्चित?

अमोल शित्रे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा आणि निधानसभा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये मध्यरात्रीपर्यंत खबलते सुरू आहेत. त्यातच मावळ लोकसभा मतदार संघावर सर्वच पक्षांचा डोळा आहे. हा मतदार संघ शिवसेनेला सुटला तर भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा स्वप्नभंग होणार आहे. तथापि, स्पर्धेत टिकण्यासाठी मध्यंतरी जगतापांनी खासदार बारणे यांना चुचकारून सोडले होते. त्यावरून “भाऊ” कोणत्याही परिस्थितीत मावळ लोकसभा लढवणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, त्यांचे राजकीय विद्यापीठ असलेल्या भोसरीत अद्याप कमालीची शांतता आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू माजी आमदार विलास लांडे यांनी गेल्या कित्येक महिन्यांपासून अभूतपूर्व मौन धारण केले आहे. मुंबईतील पक्षाच्या बैठकीत शिरूर लोकसभेतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी त्यांची भूमिका अनिश्चित दिसत आहे. हे कुलगुरू नेमके कोणते धडे गिरवित आहेत, असा प्रश्न त्यांच्या शिष्यांना पडला आहे.

भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानले जाते. गेल्या पंधरा वर्षांपूर्वीपासून त्यांनी शहराचे नेतृत्व केले आहे. त्यात माजी आमदार विलास लांडे यांचे कायम योगदान राहिले आहे. मात्र, गेल्या विधानसभेला भोसरीत कायापालट झाल्याने येथील नेतृत्व आमदार महेश लांडगे यांच्या हाती गेले. तथापि, लांडे यांचे राजकीय स्थान मात्र, अद्यापही अबाधित आहे. असे असले तरी, जगतापांना आता मावळ लोकसभा लढवायची आहे. मात्र, हा मतदार संघ शिवसेनेकडे राहिल्याने कोणत्याही शर्तीवर सेना ही जागा सोडणार नाही, हे “काळ्या दगडावरची पांढरी रेष”, एवढे सत्य आहे. परंतु, जगतापांच्या राजकीय इच्छाशक्तीपुढे सर्वकाही शूल्लक आहे. त्यांनी ठरविल्यास गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे पर्याय देखील ते निवडू शकतील, असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. त्यासाठीच त्यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर निशाना साधला होता. त्यांच्या निवासस्थानापासून ते मावळ लोकसभा मतदार संघात त्यांनी केलेल्या विकास कामांचे वाभाडे त्यांनी काढले होते. केवळ “पत्रकबाजी करणारा खासदार” म्हणून त्यांनी बारणे यांना खिदवले होते. त्यावर बारणे यांनी माघार घेतल्याने या वादावर कालांतराने पडदा पडला. यावरून बारणे यांच्याशी असलेले राजकीय वैर जगतापांच्या मनात आजही सलत असल्याचे समोर आले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत जगताप मावळातून बारणे यांना टक्कर देणार हे आता स्पष्ट झाले आहे.

मात्र, जगतापांचे कट्टर मित्र असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या भूमिकेवर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. लांडे यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून मौन धारण केले आहे. पक्षाचा कार्यक्रम सोडला तर ते कोणत्याच विषयावर आपले मत व्यक्त करताना ते दिसत नाहीत. “भोसरी हे राजकीय विद्यापीठ असून या विद्यापीठाचे कुलगुरू विलास लांडे आहेत”, अशी प्रतिक्रिया देखील जगतापांनी भोसरीत दिली होती. मग या विद्यापीठाचे गुलगुरू नेमके कोणते राजकीय धडे गिरवत आहेत, असा प्रश्न त्यांच्या शिष्यांना पडला आहे. जगतापांप्रमाणे त्यांनी सुध्दा आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. कारण, शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबतीत आता लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. याचा फायदा घेऊन लांडे मैदानात उतरणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, तेथील विकास कामांच्या बाबतीत त्यांचे एकही विधान अद्याप बाहेर आलेले नाही. भोसरीचे आमदार लांडगे आणि लांडे यांच्यात राजकीय विरोध असला तरी, लांडे यांना शिरूर मतदार संघातून लोकसभेत पाठवून लांडगे यांना पुन्हा भोसरी विधानसभा पदरात पाडून घ्यायची आहे, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यानुसार लांडे यांनी परवा मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीत शिरूर लोकसभेतून लढण्याची इच्छा देखील प्रकट केली आहे. परंतु, त्यांनी अद्याप मौन सोडलेले नाही. आढळरावांच्या विरोधात शड्डू ठोकला असला तरी त्यांनी शिरूर लोकसभेतील नागरिकांच्या हिताच्या एकाही प्रश्नावर स्वतःचे मत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.

आढळरावांना पाडण्यासाठी भोसरीकरांची एकजूट?

सलग तीनवेळा खासदार राहिलेले शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सभोवती विरोधी वातावरण तयार होऊ लागले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी भोसरीचे विद्यमान आणि माजी आमदार टपून बसले आहेत. त्यासाठी दोघांचेही सुप्त प्रयत्न सुरू असल्याचे समजते. विद्यमान आमदार लांडगे यांनी आढळराव यांच्यावर निशाना साधत शिरूर लोकसभा लढविणार असल्याचा कांगावा सुरूवातीला केला होता. नाशिक महामार्ग, बैलगाडा शर्यत, शेतक-यांचे आंदोलन आदी प्रश्नांवरून आढळरावांना टार्गेट केले होते. मात्र, अचानकपणे आमदार लांडगे यांनी या मतदार संघातून काढता पाय घेतला. आता त्यांच्याऐवजी माजी आमदार विलास लांडे यांची लोकसभा लढण्याची इच्छा आहे. त्यासाठी लांडगे स्वतः प्रयत्न करणार असल्याचीही चर्चा राजकीय जाणकारांमध्ये केली जात आहे. एकदा का लांडे शिरूर लोकसभेतून खासदार झाले की, भोसरी विधानसभेवर पुन्हा महेश दादांचीच वर्णी लागणार असा कयास बांधला जात आहे. ही खेळी यशस्वी करण्यासाठीच जगतापांचे कुलगुरू लांडे निशब्द भूमिकेत असल्याचे मानले जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button