आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा, मग राममंदिर बांधायला जावे – खासदार नारायण राणेंचा सल्ला
पुणे – “”बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चर्चा अजूनही सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पहिल्यांदा बाळासाहेबांचे स्मारक बांधावे आणि मग राममंदिर बांधायला जावे,” असा टोला खासदार नारायण राणे यांनी लगावला.
पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने “पुण्यभूषण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. डॉ. सतीश देसाई, विद्याधर अनास्कर, मुकुंद टांकसाळे, युवराज शहा, सुधीर गाडगीळ, सुरेश तलाठी आदी उपस्थित होते. शहा यांनी राणे यांची मुलाखत घेतली. राणे म्हणाले, “”मी नागपूरचा, नांदेडचा नाही; मी कोकणचा आहे. 2019ला मी काय करणार, कुठे जाणार, याची घाई आताच करू नका. माझा पक्ष विधानसभेची निवडणूक लढविणार हे मात्र निश्चित आहे.”
आगामी निवडणुकीत मोदी की राहुल, या प्रश्नावर मोदी असे उत्तर देत राणे म्हणाले, “”कॉंग्रेस आणि भाजप सारखेच आहेत; पण उद्धव आणि राज आम्हाला नको आहेत. भाजपशी माझे संबंध जुळवले असले, तरीही मी कोणाचा झालो नाही. माझा पक्ष स्वतंत्र आहे. माझ्याकडे कोकणातला म्हणूनच पाहावे.” असे ते म्हणाले.