breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या चौकशीसाठी निरीक्षकांची नियुक्ती

धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील अधिक्षकांचे आदेश

पिंपरी, ( महा ई न्यूज ) –  थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयातील सर्व प्रकाराची चौकशी करावी, याकरिता धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  धर्मादाय रुग्णालयांमध्ये दाखल होणारा आर्थिक दुर्बल घटकांतील गोरगरीब रुग्ण मोफत उपचारास पात्र नसेल, तर त्याबाबत संबंधित रुग्ण व त्याच्या नातेवाइकाला न कळविता उपचार नाकारू नयेत, त्याबाबतचा अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाला सादर करावा. तसेच गरीब रुग्णांवरील मोफत उपचार योजनेची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेशही धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या नावात धर्मादाय किंवा चॅरिटेबल असा उल्लेख करण्याबाबत आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी न केल्याने धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आदित्य बिर्ला रुग्णालयाला फटकारले आहे.

थेरगाव येथील आदित्य बिर्ला हे धर्मादाय रुग्णालय आहे. हे रुग्णालय शासनाचे विविध फायदे लाटत आहे. त्यामुळे या रुग्णालयाने कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास त्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. परंतु, बाहेरून पंचतारांकित वाटणारे आदित्य बिर्ला रुग्णालय गरीब रुग्ण उपचारास आलेल्यांना डावलेले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १०) पुण्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात आंदोलन केले. तसेच थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुजोरीपणाविरोधात कारवाईचे लेखी आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

त्यानंतर धर्मादाय सह आयुक्त कार्यालय पुणे रुग्णालय शाखेच्या अधीक्षकांनी पिंपरी-चिंचवड शहर रिपब्लिकन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भारत मिरपगारे यांना लेखी आश्वासन दिले आहे. त्यामध्ये दशरथ आरडे यांना उपचाराच्या बिलासाठी डांबून ठेवणे व त्यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी निरीक्षकांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे. चौकशी अहवाल येताच आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुजोर प्रशासनावर फौजदारी किंवा तत्सम स्वरुपाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही लेखी आश्वासनात म्हटले आहे.

तसेच रुग्णालय शाखेच्या अधीक्षकांनी सोमवारी (दि. १०) दिलेल्या लेखी आदेशात आदित्य बिर्ला रुग्णालयाने नावापुढे धर्मादाय किंवा चॅरिटेबल असा उल्लेख न केल्याबद्दल रुग्णालयाला फटकारले आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटक तसेच गरीब रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात केल्या जाणाऱ्या उपचारांबाबतच्या योजनेची माहिती देणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार घेण्यासाठी रुग्ण दाखल झाल्यास तो अशा स्वरुपाच्या उपचारांसाठी पात्र नसल्यास त्याबाबत संबंधित रुग्णास अथवा त्यांच्या नातेवाइकांना कळविण्यात यावे. तसेच त्याचा अहवाल धर्मादाय आयुक्त कार्यालयाला सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button