breaking-newsराष्ट्रिय

अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांच्यापेक्षा चहावाल्याने चांगल्या पद्धतीने देश चालवला: अमित शाह

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपा सरकार देशाला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे अशी टिका केल्यानंतर या टिकेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर दिले आहे. मनमोहन सिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञापेक्षा चहावाल्याने देश चालवण्याचे काम चांगल्या पद्धतीने केल्याची टिका शाह यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शाह नवी दिल्ली येथे बोलत होते.

मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर नवव्या स्थानी नेऊन ठेवले. आम्ही मागील पाच वर्षांमध्ये हीच अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर आणल्याचे सांगत शाह यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीवर टिका केली. तसेच पुढील काही महिन्यात भारतीय अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर जाईल असा विश्वास शाह यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. आम्ही इतके सारे करुनही ते (काँग्रेस आणि विरोधक) आम्हाला अर्थशास्त्र शिकवत आहेत असा टोला शाह यांनी यावेळी लगावला.

मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलताना, ‘तुम्ही अर्थतज्ज्ञ आहात याचा आम्ही आदर करतो. आम्हाला तुमच्या ज्ञानाविषयी काहीच शंका नाही. पण देश चालवण्याचे काम तुमच्यापेक्षा एका चहावाल्याने चांगल्या पद्धतीने केले’ असे शाह म्हणाले. मोदी नेहमी स्वत:ला चहावाला म्हणतात त्यावरूनच शाह यांनी मोदींनी मनमोहन सिंग यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने देश चालवला असे सूचित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले ३० ऐतिहासिक निर्णय आपण या वेळी सांगू शकतो असे सांगतानाच विरोधकांनी मागील ३० वर्षांच्या काळात अशाप्रकारेच केवळ चार ते पाच निर्णय घेतल्याची टिकाही शाह यांनी केली. “आम्ही सत्तेत येऊन केवळ पाच वर्षे झाली आहेत तरी मी सरकारने घेतलेल्या सर्जिकल स्ट्राइक, जीएसटी, नोटबंदी यासारख्या देशहितासाठी घेतलेल्या ३० ऐतिहासिक निर्णयांची यादी तुम्हाला सांगू शकतो”, असेही शाह यावेळी म्हणाले.

मोदींनी अर्थव्यवस्थेला स्थिरता देत लोकशाहीला धक्का न लावता प्रशासनाचा नवीन आराखडा अंमलात आणल्याचेही शाह यांनी सांगितले. मी मागील ३५ वर्षांपासून मोदींबरोबर काम करत आहे. समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपूर्ण ऐकून घेण्याचा गुण मोदींमध्ये असल्याने ते यशस्वी झाल्याचे शाह यांनी सांगितले. एखादी व्यक्ती आपल्या निर्णयांवर ठाम राहत असेल आणि त्याला अनुसरून काम करत असेल तर त्याला हुकूमशाह नाही म्हणता येणार. जो सर्वांचे ऐकून घेतो तो देश चांगल्या प्रकारे चालवू शकतो. आणि मोदी सर्वांचेच ऐकून घेत असल्याचे मत शाह यांनी नोंदवले.

काय म्हणाले होते मनमोहन सिंग

पंजाबच्या मोहाली येथे बोलताना काँग्रसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपा सरकार देशाला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे, असा गंभीर आरोप केल. देशाचं स्वातंत्र्य मजबूत करण्यात काँग्रेसनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण गेल्या साडेचार वर्षात या भाजप सरकारनं भारताच्या इतिहासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, अशा गोष्टींना बळ दिलं आहे. सरकारचा सध्याचा कारभार पाहता देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय, हे सरकार कशा पद्धतीनं देशाला चुकीच्या मार्गानं घेऊन जात आहे, हे जनतेनं समजून घ्यायला हवं. त्याविरोधात सगळ्यांनी ताकदीनं लढायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं.

याशिवाय उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरुन सिंग यांनी केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केलं होतं. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का असल्याचं सिंग म्हणाले होते. डॉक्टर पटेल हे एक मोठे अर्थशास्त्री होते. भारतातील आर्थिक संस्था आणि आर्थिक नितींबाबत अत्यंत काळजी असणारे व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा देणं दुर्दैवी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे. केंद्राचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीकडे असल्याचा संशय आरबीआयकडून काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता, आता तसं काही घडणार नाही अशी मी अपेक्षा ठेवतो असंही सिंग म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button