अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहामध्ये भारतीय वंशाच्या महिलेचा प्रवेश शक्य
वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अमेरिकन सिव्हील इंजिनिअर अरुणा मिलर या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहामध्ये प्रवेश मिळवण्याची जोरदार शक्यता आहे. वॉशिंग्टन डी.सी.चे उपनगर असलेल्या मेरीलॅन्ड येथून प्रतिनिधीगृहामध्ये निवडून जाण्याचा त्यांना आत्मविश्वास वाटतो आहे. मेरीलॅन्ड येथून सर्व पुरुष उमेदवार असल्याने मिलर यांना विजयाचा विश्वास वाटतो आहे.
हैदराबादेत जन्म झालेल्या अरुणा मिलर या प्रतिनिधीगृहामध्ये निवडून गेल्यास या सभागृहामध्ये निवडून जाणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय अमेरिकन महिला ठरतील. त्यांच्यापूर्वी प्रमिला जयपाल यांनी वॉशिंग्टन राज्यातून निवडून प्रतिनिधीगृहामध्ये प्रवेश केला आहे.
अरुणा मिलर या 7 वर्षे वय असताना 1972 साली अमेरिकेमध्ये आल्या होत्या. व्यवसायाने सिव्हील इंजिनिअर असलेल्या अरुणा मिलर यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी सहकारी डेव्हिड ट्रोन यांच्याशी सामना करावा लागणार आहे. उद्या (26 जून) या दोघांपैकी एकाची निवड होणार आहे.
मेरीलॅन्ड हा डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला असल्याने विजेत्या उमेदवाराचा प्रतिनिधीगृहातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. ही उमेदवारी मिळवण्यासाठी ट्रोन यांनी आतापर्यंत 1 कोटी डॉलर खर्च केले आहेत. तर मिलर यांना समर्थकांकडून 13 लाख डॉलरच उभे करणे शक्य झाले.