breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अभिरुप सभा: नागरिकांसाठी ढगातून स्ट्रॉद्वारे शुध्द पाणी आणणार – आयुक्तांचा निर्णय

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरात पाणी टंचाई असून भविष्यात अधिक पाऊस पाडण्यासाठी शहरावर मोठ्या प्रमाणात ढग साचविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यावर या टंचाईवर कायमस्वरुपी पर्याय म्हणून यापुढे थेट ढगातूनच स्ट्रॉद्वारे शुध्द पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, बीआरटी आणि मेट्रोच्या कामामुळे अरुंद रस्ते झाल्याने पालिकेच्या कर्मचा-यांना कामावर येताना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिका-यांसाठी घरी बसूनच काम करू देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशा गमतीदार वातावरणात पालिकेची अभिरुप सभा उत्साहात पार पडली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त आज गुरूवारी (दि. 11) अभिरुप सभा घेण्यात आली. या सभेला पालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर हे महापौरांच्या भूमिकेत होते. तर, महापौर राहूल जाधव हे आयुक्तांच्या भूमिकेत होते. पक्षनेते एकनाथ पवार नगरसचिवच्या तर स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि उपमहापौर सचिन चिंचवडे अतिरिक्त आयुक्तांच्या भूमिकेत होते. मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी चोपदार म्हणून भूमिका पार पाडली. तर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर उपमहापौर, लेखापाल जितेंद्र कोळंबे स्थायी समिती अध्यक्ष, सह शहर अभियंता प्रवीण तुपे सभागृह नेत्याच्या, तर अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभावली. इतर सर्व नगरसेवक प्रशासकीय अधिका-यांच्य भूमिकेत होते. तर, अधिकारी, कर्मचारी हे नगरसेवकांच्या भूमिकेत होते.

आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हायं’ या गाण्याने महासभेला सुरुवात झाली. अभिरुप महासभेच्या विषयपत्रिकेवर पाच विषय होते. त्यापैकी दोन विषय मंजूर करण्यात आले. सभेला सुरुवात होताच नगरसचिवाच्या भुमिकेत असलेल्या एकनाथ पवार यांनी नगरसेवक काम करत नसल्याने त्यांना निष्कासित करावे, महापालिकेची इमारत विकण्याचा विषय वन-के खाली दाखल करुन घेतला. नगरसेवकाच्या भूमिकेत असलेल्या उल्हास जगताप यांनी नगरसचिवांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

स्ट्रॉद्वारे आणलेले पाणी आमदारांना देणार

पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही शहराला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर सह शहर अभियंत्याच्या भुमिकेत असलेल्या राहुल कलाटे यांना खुलासा मागितला. त्यावर कलाटे म्हणाले की, शहरात पाणी खुप झाले आहे. प्रमाणापेक्षा पाऊस जास्त पडला आहे. ढगामधून स्ट्राद्वारे नव्हे तर मेट्रोद्वारे पाणी आणले जाईल. तसेच, अगोदर आमदारांना पाणी दिले जाईल. त्यानंतर नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याची कोपरखळी त्यांनी मारली.

सर्वांना पाणी पाजणारच, ढग उभे करणारच

अग्निश्माक अधिका-यांच्या भुमिकेत असलेले दत्ता साने म्हणाले, सल्लागार नागपूरवरुन येत आहे. त्यांच्या खुलाशावर समाधान न झाल्याने आयुक्तांच्या भुमिकेत असलेले राहुल जाधव म्हणाले, शहरवासियांसाठी उजणी धरणातून पाणी आणले जाईल. उजणी धरणाचे पाणी चांगले आहे. सर्वांना समान पाणीपुरवठा केला जाईल. मी पारदर्शकपणे काम करत असून सत्ताधा-यांना पैसे कमवून देत नाही. मी कोणाला पैसे कमवून दिले आहेत. त्याचे विरोधकांनी पुरावे द्यावेत, असे खुले आव्हानही त्यांनी केले. त्याला नगरसेवक उल्हास जगताप यांनी आक्षेप घेतला. आयुक्त राजकीय भाषण करत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते दिलीप गावडे यांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सत्ताधा-यांसोबत असल्याचे सांगितले. सभागृह नेते तुपे म्हणाले, शहरावर जास्तीत-जास्त ढग आणण्यासाठी आमचे केंद्रापासून प्रयत्न सुरु आहेत. महापौर श्रावण हर्डीकर म्हणाले, सगळ्यांना पाणी पाजणारच, ढग उभे करणार, कोणाला तहानलेले ठेवणार नाही. दरम्यान, मुख्यलेखापरिक्षक आशा शेंडगे यांना समाधानकारक खुलासा न करता आल्याने आयुक्त जाधव यांनी त्यांची बढती रद्द केली.

कुत्री, डुक्करांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

नगरसेवक प्रमोद ओंभासे, विजय भोजने यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सभागृहात कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ओंभासे यांना तीन मिनिटांसाठी निलंबित करण्यात आले. भटकी कुत्री, डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर खुलासा करताना आयुक्त जाधव म्हणाले, शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाच्या घरासमोर कुत्री, डुक्करांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे.

ओंभासे, भोजने यांची घोषणाबाजी

आयुक्तांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने नगरसेवक ओंभासे, भोजने यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. कागदे फिरविली. त्यामुळे महापौर हर्डीकर यांनी ओंभासे यांना 30 वर्षासाठी निलंबित केले. त्यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. गोंधळामुळे महापौर हर्डीकर यांनी सभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button