breaking-newsपुणेमहाराष्ट्र

..अन् भाजप इच्छुकांचा सुटकेचा नि:श्वास!

  • शहा-शिरोळे यांच्या न झालेल्या भेटीची शहरात चर्चा

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेणार या ‘चर्चे’ने पक्षातील इच्छुकांची ‘धाकधूक’ रविवारी भलतीच वाढवली. मात्र ऐनवेळी ठरलेली भेट होऊ न शकल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, पण अमित शहा नक्की शिरोळे यांच्या पक्ष कार्यालयाला भेट देणार होते की, या परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये निमंत्रितांशी संवाद साधणार होते, याबाबत पक्ष वर्तुळात जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. दरम्यान, अमित शहा यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची रविवारी रात्री सदिच्छा भेट घेतली.

अमित शहा यांचे पुणे दौऱ्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे समाजमाध्यमे हाताळणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद आणि गणेश कला क्रीडा रंगमंच येथे चाणक्य नीती या विषयावरील व्याख्यान असे पूर्वनियोजित कार्यक्रम होते. या अधिकृत कार्यक्रमांसाठी शहा यांचे रविवारी सकाळी पुण्यात आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमापूर्वी खासदार शिरोळे यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या एका तारांकित हॉटेलमध्ये अमित शहा काही मोजक्या निमंत्रितांशी संवाद साधणार होते. या हॉटेल शेजारीच शिरोळे यांचे संपर्क कार्यालय असल्यामुळे शहा यांनी कार्यालयाला भेट द्यावी, अशी विनंती शिरोळे यांनी केली आणि शहा यांनी ती मान्य केल्याची चर्चा शहर भाजपच्या वर्तुळात सुरू झाली. या परिसरात शहा येणार म्हणून पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला. रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे शहा-शिरोळे भेटीच्या चर्चेला आणखी जोर मिळाला. मात्र, काहीतरी चक्रे फिरली आणि शहा या भागात फिरकलेच नाहीत.

दरम्यान, अमित शहा यांनी पुण्यात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन  घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी त्यांच्या समवेत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button