breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अनधिकृत हॉटेलवर थांबणाऱ्या बसवर करडी नजर

  • एसटी चालक, वाहकांवर कारवाई करा

  • पुणे विभागाचे आदेश

पुणे- एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या बसला प्रत्येक मार्गावर अधिकृत हॉटेलवर थांबा ठरवून दिला आहे. परंतू, काही चालक आणि वाहक अनधिकृत हॉटेलवर बस थांबवित असल्याचे प्रकार समोर आले आहेत. मागील काही महिन्यात पुणे – कोल्हापूर या मार्गावर पुणे विभागाच्या हद्दीतील बस अनधिकृत हॉटेलवर थांबत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे यापुढे मार्ग तपासणी पथक प्रमुखांनी अशाप्रकारे अनधिकृत हॉटेलबर बस थांबविणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाई करावी, अशा सूचना एसटीच्या पुणे विभागाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिल्या आहे.

पुणे-कोल्हापूर-पुणे मार्गावर एसटीच्या अनेक फेऱ्या होत आहेत. त्यांना पुणे विभागामध्ये कोणत्याही हॉटेलवर थांबा देण्यात आलेला नाही. मात्र, एसटीचे चालक, वाहक काही अनधिकृत हॉटेलवर थांबा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल जोशी यांनी घेतली आहे. जोशी यांनी अनधिकृत हॉटेलवर थांबणाऱ्या चालक, वाहकांवर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. त्यासाठी मार्ग तपासणी पथक प्रमुखांना संबंधित मार्गावरील अनधिकृत हॉटेलवर थांबणाऱ्या एसटी फेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत.

पुणे विभागाबरोबरच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कोल्हापूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोले, बुलढाणा आणि यवतमाळ विभागालाही त्या संबंधिचे पत्र दिले आहे.

राज्यातील ज्या विभागातील एसटीचे चालक, वाहक अनधिकृत हॉटेलवर थांबा घेतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या विभागावर राहणार आहे. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. सर्व विभागांनी याची गंभीर दखल घ्यावी, असेही या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, बारामती, पिंपरी-चिंचवड, दौंड, शिरुर, इंदापूर या सर्व आगारांमधील सर्व चालक, वाहकांना अनधिकृत हॉटेलवर थांबा घेतल्यावर होणाऱ्या कारवाईची लेखी सूचना द्यावी. तसेच ही सूचना नोटीस बोर्डावरही लावावी, असेही जोशी यांनी सांगितले आहे.

पुणे विभागातील सर्वच मार्गाची कसून तपासणी
पुणे-कोल्हापूर – पुणे मार्गावरील एसटी बस अनधिकृत हॉटेलवर थांबा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी पुणे विभागातील सर्वच मार्गांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाकडून लांबच्या मार्गावर अधिकृत हॉटेलचा थांबा नेमून दिला जातो. या हॉटेलवर मिळणाऱ्या पदार्थांचा दर्जा, किंमत ठरवून दिलेली असते. मात्र, अनेकदा एसटीचे चालक, वाहक अनधिकृत ठिकाणी गाडी थांबवितात. या प्रकारामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे या प्रकाराबाबत कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असे यामिनी जोशी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button