breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अजित पवार बोलले अन्‌ सभागृह गळले

  • सभागृहाचे कामकाज तकलादू असल्याची केली होती टीका

पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या प्रशासकीय कामकाजावरील पकड आणि स्पष्टोक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. महापालिकेच्या विस्तारित इमारत उद्‌घाटनापूर्वीच पवार यांनी गुरूवारी सकाळीच पाहणी केली आणि सभागृहाचे कामकाज पाहून “हे अतिशय तकलादू आहे,’ अशी टीका करत पावसात हे गळणार तर नाही ना? असा खोचक प्रश्‍नही पवार यांनी केला आणि त्यानंतर खरंच या सभागृहाला गळती लागली.

पालिकेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन सन 2015 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे या लोकार्पणाच्या कार्यक्रमास ते येतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, इमारतीच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम भाजपकडून “हायजॅक’ केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे पवार हे कार्यक्रमाला येणार नसल्याचे बुधवारीच निश्‍चित झाले होते. असे असले, तरी अजित पवार सकाळी साडेआठ वाजताच इमारतीचे काम पाहण्यास पोहचले. त्यावेळी त्यांना केवळ हॉल दाखविण्यात आला. मात्र, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या व पहिल्या मजल्यावरील सर्व समिती कार्यलये तसेच पक्ष कार्यालयांची पहाणी केली. त्यावेळी अनावश्‍यकपणे जागा अडविणे, चुकीच्या पद्धतीचे फर्निचर बसविणे, कामाला योग्य पद्धतीचे फिनिशिंग नसणे, अशा बाबी त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. त्यावरून त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्तीच केली. त्यामुळे अधिकारीही चांगलेच गडबडून गेले. मात्र, आता काहीच होणार नसल्याची खंत व्यक्त करत पवार यांनी कामाबाबत नाराजी व्यक्त करत तिथून जाणेच पसंत केले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महापालिकेच्या भवन विभागाचे प्रमुख शिवाजी लंके यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, या भेटीवेळी पवार यांनी या सर्व इमारतीच्या कामाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “एखाद्या सहकारी संस्थेची कार्यालये तरी यापेक्षा बरी असतात,’ अशा बोचऱ्या शब्दांत या कामावर टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button