breaking-newsक्रिडा

अखिल भारतीय स्नूकर स्पर्धा आजपासून रंगणार

  • डेक्‍कन जिमखानातर्फे आयोजन : सर्वोत्तम खेळाडू नसल्यामुळे नवोदितांना चांगली संधी

पुणे-डेक्‍कन जिमखाना क्‍लबतर्फे पहिल्या डेक्‍कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 15 ते 23 जून 2018 या कालावधीत डेक्‍कन जिमखाना आणि पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब येथे होणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक संजीव ताटके, राजेंद्र आढाव आणि उषा खंडेलवाल यांनी सांगितले की, डेक्‍कन जिमखाना येथे होणाऱ्या या स्पर्धेला या वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. भारतातील सर्वोत्तम मानांकन असणाऱ्या 32 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही. परिणामी स्पर्धेत देशातील सर्वोत्तम खेळाडू नसल्यामुळे स्थानिक, उदयोन्मुख तसेच कमी मानांकन असणाऱ्या खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. आणि हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

ताटके यांनी सांगितले की, या वर्षी पहिल्यांदाच डेक्‍कन जिमखानातर्फे राष्ट्रीय स्तरावरील स्नूकर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक “क्‍यू’पटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा बाद पद्धतीने होणार आहे.

स्पर्धेच्या प्रवेशिका 128 खेळाडूंपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. एकूण नऊ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 75 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूला करंडक व 30 हजार रुपये तर, उपविजेत्या खेळाडूला करंडक व 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

उपान्त्य फेरीतील खेळाडूंना सात हजार रुपये व उपान्त्यपूर्व फेरीतील खेळाडूंना चार हजार रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार असल्याचे रेगो यांनी सांगितले. या शिवाय सर्वाधिक गुणांचा ब्रेक नोंदविणाऱ्या खेळाडूला पाच हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुणे, मुंबई, ठाणे, चिपळूण, सातारा, नाशिक, कोल्हापूर, कऱ्हाड, सोलापूर अशा राज्यभरातील शहरांमधून, तसेच मध्यप्रदेश, चेन्नई, कर्नाटक व हैदराबाद येथूनही प्रवेशिका आल्या आहेत.

पुणे शहरातील पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्‍कन जिमखाना क्‍लब, कॉर्नर पॉकेट, पूना क्‍लब, टर्फ क्‍लब, क्‍यू क्‍लब, ऍरिझोना, पीजीआय अशा विविध क्‍लबमधील अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये समर खंडेलवाल, आनंद रघुवंशी, अरान्ता सॅंचेस, अनुपम झा, कृष्णा बराड, योगेश कुमार, सिद्धार्थ टेंभे, जयदीप खांडेकर, गौरव पतंगे अशा खेळाडूंचा समावेश असल्याचे राजेंद्र आढाव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button