पुणे – विचारवंतांना नजरकैदेत ठेवले जाते, जेलमध्ये टाकले जाते. दंगली घडवणाऱ्यावरील गुन्हे मागे घेऊन मोकाट सोडले जात आहे. ज्यांच्यावर आरोप नाहीत त्यांना नजरकैदेत ठेवलं जातं आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट सोडलं जात असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांना आणि सरकारवर संरशधान साधले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे स्टेशन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सकाळी 9 ते 11वाजताच्या दरम्यान मूक आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी सरकारवर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली.
तसेच त्या म्हणाल्या की, गांधीजींनी जो शांततेचा मार्ग सांगितला तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व या दोन्हीची सांगड घालत याची जाणीव आजच्या पिढीला करून देण्यासाठी आज आम्ही येथे शांततेत आंदोलन केले. निवडणुकीपूर्वी पारदर्शक कारभाराच्या घोषणा केल्या पण पारदर्शक कारभार दिसत नाही. सरकारमध्ये असणारे जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतात आणि त्यावर सरकार किंवा गृहमंत्रालयाने कुठलेही भाष्य केले नाही. कालवा फुटी चे प्रकरण लक्षात घेता स्वतः वरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकल्याचे गिरीश महाजन यांच्या विधानातून स्पष्ट होते.ही बाब अंत्यत चुकीची आहे. आपण 21 व्या शतकात असताना कोल्हापूरच्या देवीचे दर्शनासाठी तोकडे कपडे घालणाऱ्याना प्रवेश नसल्याची चर्चा सुरू आहे.अशा प्रकारची चर्चा होणे आणि निर्णय घेणे चुकीची बाब आहे.अशा गोष्टींवर चर्चा होण्यापेक्षा कुपोषण, महिलांवरील अत्याचार आणि सुरक्षितता यावर लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.