वाकडमध्ये अमृत योजनेतून HDPE पाईप टाकण्याच्या कामाला सुरूवात
- स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ
- वाकडमधील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटणार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – वाकड मधील दक्षता नगर कस्पटेवस्ती येथे पाणीपुरवठा विभागातर्फे अमृत योजनेअंतर्गत १६० मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी या परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.
अनेक दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या होती. येथील पाईपलाईन जुनी असल्या कारणाने या ठिकाणी पाणी कमी दाबाने येत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या येथील नागरिकांना भेडसावत होती. येथील सर्व नागरिकांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्याकडे या संदर्भात तक्रार मांडली होती. त्यावर त्यांनी या पाणीपुरवठा विभागाशी योग्य तो पाठपुरावा करून येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा, व जोपर्यंत येथील पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश संबंधित पाणीपुरवठा विभागाला दिले.
गेले काही दिवस या परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू होता. आज अमृत योजनेअंतर्गत १६० मी. मी. व्यासाचे HDPE पाईप टाकून या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे, कनिष्ठ अभियंता सचिन कुतवळ व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.