breaking-newsमहाराष्ट्र

राफेलबाबत आता जनताच निर्णय घेईल – खा. संजय राऊत

पंढरपूर – राफेलबाबत आता जनताच निर्णय घेईल. याप्रश्नी संसदेचे अधिवेशन बंद पडू शकेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी दिली. तसेच राज्यात रामराज्य आणि शिवशाही आणण्यासाठी पंढरीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची २४ डिसेंबरला महासभा होणार आहे. असेही त्यांनी या वेळी सांगितले. खासदार राऊत पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते.

अयोध्येनंतर महाराष्ट्रात प्रथमच पंढरपूर येथे २४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंची महासभा होणार आहे. याच सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी खा. संजय राऊत पंढरपूर येथे आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी खा. विनायक राऊत, प्रा. शिवाजी सावंत, लक्ष्मीकांत ठेंगे पाटील, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शहरप्रमुख रवींद्र मुळे, विनोद कदम आदी उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना खा. राऊत म्हणाले , येत्या २४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंची महासभा ही ऐतिहासिक होईल. ‘न भूतो न भविष्यती’ अशी गर्दी या सभेला होईल. अयोध्येमधे शरयूतीरी जशी आरती झाली, तशीच पंढरपूरच्या चंद्रभागेच्या आरतीचा सोहळा देखील होणार आहे. या प्रसंगी राज्यातील अनेक साधू-संत महंत उपस्थित राहतील. पंढरीचा पांडुरंग हा कष्टकरी, शेतकरी, मजुरांचे दैवत आहे आणि शिवसेना देखील अशाच कष्टकरी मजुरांसाठी काम करीत आहे. २०१९ ला सेनेचे सरकार येईल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. अयोध्येच्या प्रश्नासह इतर प्रश्नांसह शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपली भूमिका या सभेत स्पष्ट करतील असे त्यांनी सांगितले.

राफेलप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करताना खासदार राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने बोफोर्सचा प्रश्न जनतेसमोर आला. तसाच राफेलबाबतही आता जनताच निर्णय घेईल. संसदेमधे या प्रश्नी गदारोळ होईल, असे सूतोवाच त्यांनी या वेळी केले. राम मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय असून याप्रश्नी सर्वच पक्षांनी एकत्र यावे. या मधेच सातत्याने आमच्यावर टीका करणारे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी संसदेत राममंदिराचा अध्यादेश काढण्यासाठी पवारांचे देखील मन वळवावे, असा टोला त्यांनी या वेळी लगावला.

विरोधाचे नव्हे तर दबावाचे यश

केंद्रात आणि राज्यात आम्ही सरकारमधे असलो आणि विरोध करीत असलो, तरी आमच्या विरोधामुळे नव्हे तर दबावामुळे केंद्रात आणि राज्यात सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडतो. राज्यातील दुष्काळासाठी केंद्रातून निधी आणा, ही भूमिका सेनेने मांडली होती. त्याबाबतच्या घडामोडी आता घडत असल्याचेही राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button