महापालिका विरोधी पक्षनेत्यांचा वर्षभरात सत्ताधारी भाजपशी मिले सूर मेरा-तुम्हारा…!
पिंपरी (विकास शिंदे)- पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॅाग्रेस नेते योगेश बहल यांनी आज (शनिवारी) विरोधी पक्षनेते पदाचा महापाैर नितीन काळजे यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांचा विरोधी पक्षनेते पदावरील एक वर्षांचा कालावधी 17 मार्च 2018 रोजी संपला होता. मुदत संपून तब्बल दोन महिने उलटले तरीही त्यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवडमधील हल्लाबोल आंदोलनावेळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर होणारी निवड लांबणीवर पडली. परंतू, गेल्या वर्षेभरातील विरोधी पक्षनेते पदाची कारकीर्द टोकाची भूमिका न घेतल्यामुळे त्यांनी सत्ताधारी भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांचे सत्ताधारी भाजपबरोबर मिले सूर मेरा तुम्हारा… अशा पध्दतीने कामकाज झाल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत सत्तेची स्वप्ने पाहणा-या राष्ट्रवादी कॅाग्रेसला पक्षातील अंतर्गत राजकारणाचा फटका बसला. त्यामुळे अवघे तीन सदस्य असलेल्या भाजपकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. संपूर्ण राज्यात पिंपरी चिंचवड शहर हे विकासाचे रोल माॅडेल करुन प्रचार करण्यात आला. पण, राष्ट्रवादीचा झालेला पराभव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पक्षातील अजित पवारांची एकाधिकार शाही आणि पक्षातंर्गत गटबाजीमुळे परिणामी राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक निवडून आले.
महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अनेकांचा विरोध डावलून अत्यंत विश्वासू असलेल्या योगेश बहल यांच्याकडे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. महापालिकेत 17 मार्च 2017 रोजी विरोधी पक्षनेते पदाची सुत्रे त्यांनी घेतली. सुरुवातीला त्यांनी नवीन विरोधी पक्षनेते कार्यालयासाठी भाजपबरोबर सुवता सुभा घेवून पंगा घेण्याचा प्रयत्न केला, महापैार कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन केले. तरीही त्यांना नवीन कार्यालय मिळाले नाही. काही निविदा प्रक्रियेला विरोध दर्शवून न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला. परंतू, काही दिवसानंतर त्यांचा विरोध मावळून त्याचे भाजपच्या ठराविक पदाधिका-यांशी त्यांनी सूत जुळवून घेतल्याचे दिसून आले. अखेर त्यांचा एक वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्याने राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे महापालिकेत विरोधी पक्षनेते पदासाठी नगरसेवक नाना काटे, दत्ता साने, अजित गव्हाणे, मंगला कदम यांच्या नावाशी शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे एका वर्षासाठी आता नाना काटे यांना विरोधी पक्षनेते पदावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.