breaking-newsपुणे

मराठा मोर्चाकडून आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखांची मदत

देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नसल्याने नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनादरम्यान आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला असून 37 कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांपैकी एक असलेले महेश डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मराठा क्रांती मोर्चाने आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांसाठी समाजातून पैसे गोळा करत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. सरकारने आत्महत्या केलेल्या ३७ जणांना शहीद घोषित केलं पाहिजे’.

दरम्यान यावरुन मराठा क्रांती मोर्चात फूट पडल्याचं दिसत आहे. मुंबईत एका कार्यक्रमात ही मदत दिली जाणार आहे. मात्र एका संयोजकाने हा राजकीय प्रेरित कार्यक्रम असण्याची शक्यता व्यक्त करत आपण त्यासाठी हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे.

मराठा क्रांती मोर्चाने पीडित कुटुंबियांसाठी १० लाख आणि तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची मागणी केली आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप मागणीवर उत्तर दिलेलं नाही असं डोंगरे यांनी सांगितलं आहे. यामुळेच आम्ही स्वत: पैसे गोळा करत मदत करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी पुढे बोलताना सांगितलं.

नाराज संयोजकाने हा कार्यक्रम पार पडावा यावर मराठा क्रांती मोर्चात एकमत नसल्याचं सांगितलं आहे. ‘हा निर्णय एकमताने घेण्यात आलेला नाही. जर त्यांना खरंच मदत करायची असेल तर कार्यक्रम आयोजित न करता थेट त्यांच्या घरी जाऊन मदत द्यावी’, असं त्यांनी म्हटलं आहे.

महेश डोंगरे यांनी आरोप फेटाळले असून हा राजकीय प्रेरित कार्यक्रम नसल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी मदत केली आहे त्यांची नावे आम्ही जाहीर करु असं डोंगरे यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button