breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भामा-आंद्रा धरणातून पाणी त्वरित आणणे गरजेचे – नितीन काळजे

 पिंपरी-चिंचवड शहराला भविष्यात पाण्याची मोठी टंचाई भासणार आहे. त्यादृष्टीने आत्तापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रखडला आहे. भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी आणि आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाण्याचा शहरासाठी कोटा आरक्षित आहे. या प्रकल्पाचे काम सुरु करणे गरजेचे आहे. महापौरपदावर असताना त्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केला. या प्रकल्पाचे काम वेगात होणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात पाणी संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची भीती, माजी महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केली. तसेच महापौरपदाच्या 16 महिन्याच्या कारकिर्दीवर आपण समाधानी असून समाविष्ट गावांसह शहराचा विकास करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचेही, त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर च-होलीचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक नितीन काळजे भाजपचे पहिला महापौर झाले होते. सव्वा वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शुक्रवारी महापौरपदाच्या सव्वा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत मांडला.

माजी महापौर काळजे म्हणाले, “महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपचा पहिल्या महापौर होण्याची संधी पक्षनेतृत्वाने दिली. त्याबाबत मी त्यांचा ऋणी आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या व दुर्लक्षित राहिलेल्या ग्रामीण भागाला पहिल्यांदाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. शहरासह समाविष्ट गावात विकास कामे करण्यावर भर दिला. समाविष्ट गावात आरक्षणे विकसित नव्हती. रस्ते, उद्याने नव्हती. आपण सर्व कामांना मंजुरी घेतली आहे. आगामी काही दिवसात च-होली, डुडुळगाव या समाविष्ट गावांचा चेहरा-मोहरा बदलणार असून वेगळा ठसा उमटणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे”

“खरे तर च-होलीसारख्या परिसराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्याची अपेक्षा होती. च-होलीचा झाला नाही, याची खंत असल्याचे त्यांनी बोलून दाखविली. महापौर वैद्यकीय निधीच्या माध्यमांतून दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या, अपघातग्रस्त अशा एकूण 550 रुग्णांना प्रत्येकी 5 हजार रुपये अर्थसहाय्य केले. महापौरपदाच्या कार्यकाळात चार हजार नागरी कार्यक्रमांना हजेरी लावल्याचेही, काळजे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षातील सर्व पदाधिका-यांनी सहकार्य केले. तसेच विरोधकांनी देखील सहकार्याची भूमिका घेतली” असेही ते म्हणाले.

भोसरीतून विधानसभेची निवडणूक लढविणार का असे विचारले असता काळजे म्हणाले, “भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या पदावर काम करण्याची संधी दिली. पुढील काळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून विधानसभेला दादा म्हणतील त्यानुसार भूमिका घेतली जाईल”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button