breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“बिटकॉइन’च्या आरोपींची दुबईत मालमत्ता

  • अमित भारद्वाज व इतर आठ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

पुणे – देशभर गाजत असलेल्या “बिटकॉइन’ घोटाळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज व इतर आठ जणांविरुध्द सायबर क्राईम सेलने तब्बल 4 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे, यातील आरोपींनी दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचे म्हटले आहे. ही सर्व मालमत्ता फसवणुकीतील पैशांतील आहे.

“बिटकॉइन’ या क्रिप्टो करन्सीवर आधारित गुंतवणूक योजनेत “गेन बिटकॉईन’ कंपनीत एक “बिटकॉइन’ गुंतवणुकीवर दरमहा 0.1 टक्के बिटकॉइन असे 18 महिन्यांत एक बिटकॉईनचे एकूण 1.8 “बिटकॉइन’ असा परतावा देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित महेंद्रकुमार भारद्वाज (35, रा. शालिमार बाग, नवी दिल्ली), काजल जितेंद्र शिंगवी (25, रा. महर्षिनगर, पुणे), व्यास नरहरी सापा (46, रा. भवानी पेठ, पुणे), विवेककुमार महेंद्रकुमार भारद्वाज (31, रा. नवी दिल्ली), साहिल ओमप्रकार बागल (28, रा. नवी दिल्ली), निकुंज वीरेंद्रकुमार जैन (29, रा. नवी दिल्ली), हेमंत चंद्रकांत भोपे (46, रा. धायरी, पुणे), हेमंत विश्‍वास सूर्यवंशी (51, रा.बाणेर ,पुणे), पंकज नंदकिशोर आदलाखा (40, रा. नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये दोन पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक-उप निरीक्षक आणि 10 प्रशिक्षीत कर्मचारी तसेच एक सायबर तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय?
या गुन्ह्यात गेन बिटकॉइन कंपनीचा मालक अमित भारद्वाज व त्याच्या इतर साथीदारांना दिल्ली येथून अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांचे वडील महेंद्रकुमार भारद्वाज यांच्या नावाने सन 2012 पासून नेक्‍सजेन फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी दिल्ली येथे सुरू करण्यात आली होती. त्याचा भाऊ अजय भारद्वाज हा सिंगापूर येथे नोकरीस होता. सन 2013 मध्ये अमित भारद्वाज याने अजय भारद्वाज याच्या मदतीने सिंगापूर येथे “व्हेरिएबल टेक पीटीई कंपनी’ स्थापन केली. त्यानंतर एप्रिल 2017 मध्ये “गेन बिटकॉईन डॉट कॉम’ ही वेबसाइट रजिस्टर केली. सिंगापूर येथे “बिटकॉइन क्रिस्टो करन्सी’ लिगल असल्याचे सांगत त्याआधारावर “व्हेरिएबल टेक पीटीई कंपनी’च्या अधिपत्याखाली “गेन बिटकॉइन डॉट कॉम’ वेबसाइटमध्ये गुंतवणूक केल्यास सदर “बिटकॉइन’मधून क्‍लाऊड मायनिंगद्वारे जनरेट होणारे “बिटकॉइन’ मिळवायचे. यासाठी दुबईमध्ये दोन भाऊ व इतर साथीदारांच्या मदतीने कट रचून दुबईत खूप मोठी कंपनी असल्याचे भासवत योजनाबद्ध पद्धतीने इतर आरोपींकडे वेगवेगळी जबाबदारी सोपवली. त्यामध्ये अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज हे बीटकॉइन कंपनीचे मालक असल्याचे सांगत देशभरात इव्हेंट घेऊन लोकांना आमिष दाखवली गेली. इव्हेंटमध्ये बॉलिवूड तारका आणी प्रतिष्ठीत व्यक्तींना प्रमोशनसाठी आणून “गेन बिटकॉइन’मध्ये गुंतवणूक करण्यास लोकांना आकर्षिक केले गेले. तसेज गुंतवणूकदारांना रिवार्ड म्हणून दुबई वारी, बीएमडब्ल्यू कार तसेच “बिटकॉइन’ देण्याचे आमिष दाखवले. या गुन्ह्यामध्ये “गेन बिटकॉईन’चा ऍक्‍सेस भारद्वाज बंधुंकडे असल्याने त्यांनी “बिटकॉइन’ गुंतवणूक केल्यानंतर वेबसाइटवर गुंतवणूकदारांना वेळेत परतावा दिला. त्यातून गुंतवणूकदारांना परतावा मिळत असल्याचा विश्‍वास निर्माण झाला. त्यानंतर “एमकॅप’ या क्रिप्टो करन्सीमध्ये जास्त मोबदला असल्याचे सांगून स्वत: “एमकॉप’ नावाची कंपनी स्थापन केली. “बिटकॉइन’ गुंतवणूकदारांना येथे जास्त मोबदला असल्याचे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यानंतर “गेन बिटकॉइन’ ही वेबसाइट बंद करुन पुरावा नष्ट करत त्यानंतर “जीबी 21′ ही वेबसाइट सुरू करुन कंपनी सुरू असल्याचे गुंतवणूकदारांना भासविण्याचा प्रयत्न केला.

दुबईत डोळे दीपवविणारी संपत्ती
गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या बिटकॉईनमधून आरोपींनी हॉंगकॉंग व दुबई येथील अनेक कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले. तसेच दुबई येथील जुमेरा लेक टॉवर्स येथे 31 व्या मजल्यावर 7 कार्यालये (10 हजार स्वे.फुट), मरिन प्रिन्सेस टॉवर येथे 58 व्या मजल्यावर 600-700 स्क्‍वे. फुटांची सदनिका, बिझनेस बे येथे चार कार्यालये (2 हजार स्क्वे. फुट) आणि बुर्ज खलिफा येथे सदनिका घेतली आहे.

बिटकॉईन संदर्भात 1,750 तक्रारी
दत्तवाडी पोलीस ठाण्यात आजपर्यंत या गुन्ह्यात 57 तर निगडी येथे 170 नागरिकांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या तक्रारीत 1,750 बीट कॉइनची फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील 206 बिटकॉइन व 79.999 इथेरियन तसेच 38 लाख 96 हजार रुपये रोख रक्कम जप्त आहे.

राज कुंद्रांविरुद्ध अजून पुरावे नाहीत
बिटकॉइन प्रकरणात काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्याबद्दल चर्चा सुरू होत्या. अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना चौकशीसाठीदेखील बोलवले होते. मात्र, या प्रकरणात अजून पुरावे आढळले नाहीत. मात्र, यासंदर्भात तपास सुरू असल्याचे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button