breaking-newsमहाराष्ट्र

फिफा विश्वचषक: नेमारच्या कामगिरीचे ब्राझिलला पाठबळ

  • मात्र चुकीच्या वागणुकीमुळे होतोय टीकेचे लक्ष्य

समारा: यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत अनेक मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. विश्वचषकातून जर्मनी, पोर्तुगाल, अर्जेंटिना, स्पेनसारख्या दिग्गज संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींचे लक्ष ब्राझिलचा सुपरस्टार फुटबॉलपटू नेमारच्या कामगिरीवर लागले होते. बाद फेरीत ब्राझील आणि मेक्‍सिको दरम्यान झालेल्या सामन्यात ब्राझिलने नेमारच्या खेळीच्या बळावर सामन्यात विजय मिळवला.

नेमारच्या खेळीच्या जोरावरच काल ब्राझिलने मेक्‍सिकोचा 2-0 असा एकतर्फी पराभव करत विश्‍वचषक 2018 स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली असून नेमारने मेक्‍सिकोविरुद्धच्या सामन्यात केलेल्या खेळीने आपल्या टीकाकारांचे तोंड बंद करतानाच विश्‍वचषक विजयाचे आपण दावेदार असल्याचे प्रतिस्पर्ध्यांना दाखवून दिले आहे. आता उपान्त्यपूर्व लढतीतील नेमारच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला जे जमले नाही ते नेमारने करून दाखवले. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर नेमारने ब्राझिलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे ब्राझिलला मेक्‍सिकोवर सहज विजय मिळवून फुटबॉल विश्वचषकाच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला आहे. नेमारने या सामन्यात एक गोल नोंदवला तर एक गोल करण्यासाठी मदत केली , त्यामुळे त्याच्यातील प्रतिभा पुन्हा एकदा सर्वांसमोर आली आहे.

सामन्यापूर्वी नेमारच्या खेळीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्याच्या खेळापेक्षा जास्त चर्चाही त्याच्या पडण्याची आणि फ्री किक मिळवण्यासाठी नेमार करत असलेल्या नाटकांचीच होत होती. त्यामुळे त्याला या सामन्यात चांगला खेळ करून दाखवणे गरजेचे होते, जेणे करून त्याला आपल्या टीकाकारांना शांत करता येईल. त्याने मेक्‍सिकोविरुद्धच्या सामन्यात त्याच निर्धाराने खेळ केला आणि ब्राझिलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तरीही या सामन्यातील त्याच्या चांगल्या कामगिरीनंतरही नेमारच्या फ्री किक मिळविण्यासाठीच्या नाटकांची सर्वत्र जास्त चर्चा रंगली, ज्यात मेक्‍सिकोचे कोच जुआन कार्लोस ओशोरिओ यांनीही नेमारवर टीका करताना सांगितले की, त्याने सामन्यात पडण्याचे आणि जखम झाल्याचे जे नाटक केले त्यामुळे सामन्यातील बहुमूल्य वेळ वाया गेला. एका खेळाडूच्या अशा खराब वागणुकीमुळे असा महत्त्वपूर्ण वेळ कसा वाया जाऊ शकतो, हे फुटबॉलप्रेमींच्या मनातील फुटबॉलची प्रतिमा खराब करण्यासाठीचे चांगले उदाहरण म्हणून देता येऊ शकेल.

सोशल मीडियावरही इंग्लंडचा खेळाडू ऍलन शिअररने नेमारच्या या प्रकारच्या वागणुकीला “हीन दर्जाची वागणूक’ असे संबोधले आहे. इतकेच नव्हे तर एखादा श्रेष्ठ दर्जाचा खेळाडू केवळ विजयासाठी इतक्‍या खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो असा सवालही सोशल मीडियातून केवळ नेमारच्या वागणुकीमुळे विचारला जात आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button