breaking-newsमुंबई

फटाक्यांनी मुंबई धुरकटली

  • हवेची पातळी गुरुवारी ‘अत्यंत वाईट’ स्तरावर ढासळण्याचा अंदाज

दिल्लीप्रमाणेच मुंबईवरही धुरक्याची चादर पसरली असून गेल्या दोन दिवसांत झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुंबईतील सर्वसाधारण हवेची गुणवत्ता ‘चांगली’ या पातळीवरून ‘वाईट’ पातळीवर घसरली आहे. तर गुरुवारी ही गुणवत्ता ‘अंत्यत वाईट’ स्तरापर्यंत ढासळण्याची शक्यता ‘सिस्टीम ऑफ एअर क्वॉलिटी अ‍ॅन्ड  वेदर फोरकास्टिंग अ‍ॅन्ड रिसर्च’ने (सफर) वर्तविली आहे.

पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाची ‘सफर’ ही प्रदूषणमापक यंत्रणा मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची तपासणी करते. गुणवत्तेच्या आकडय़ांच्या सुलभ मांडणीकरता प्रदूषित घटकांचे प्रमाण १०० या प्रमाणित एककात (एअर क्वॉलिटी इंडेक्स) रूपांतरित करून यंत्रणेच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल अ‍ॅपवर प्रसिद्ध केले जाते. यानुसार हवेच्या गुणवत्तेची माडंणी सर्वसामान्यांना सोयीस्कर ठरावी याकरिता १०० पर्यंत ‘चांगली’, १०० ते २०० ‘समाधानकारक’, २०० ते ३०० ‘वाईट’, ३०० ते ४०० ‘अत्यंत वाईट’, ४०० ते ५०० पर्यंत ‘धोकादायक ’ या स्वरूपात करण्यात येते. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवेचा सर्वसाधारण निर्देशांक २२१ एवढा नोंदविण्यात आला. तर गुरुवारी हा निर्देशांक ३३५ असण्याची शक्यता ‘सफर’ने वर्तविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून माझगाव, अंधेरी, बोरिवली आणि वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात हवेचा निर्देशांक ‘अत्यंत वाईट’ स्तरापर्यंत म्हणजेच ३०० ते ४०० निर्देशांकाच्या दरम्यान नोंदविण्यात आला आहे.

शहरात बुधवारी मोठय़ा प्रमाणात फुटलेल्या फटाक्यांमुळे  हवा दूषित करण्याची क्षमता अधिक असणारे पीएम २.५ आणि पीएम १ या घनरूप कणांचे प्रमाण वाढल्याची नोंद करण्यात आली.  गेल्या दोन दिवसांमध्ये पहाटे आणि रात्रीच्या वेळेत हवेची गुणवत्ता मोठय़ा निर्देशांकाने ढासळल्याचे निरीक्षणात आले आहे. दुपारनंतर चांगल्या पातळीवर स्थिरावणारी हवेची गुणवत्ता रात्रीच्या वेळी फोडलेल्या फटाक्यांमुळे पुन्हा घसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सफरप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ६४ मानवविहित आणि २४ स्वयंचलित केंद्रे उभारण्यात आली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून अंधेरी परिसरातील हवेची गुणवत्ता मोठय़ा प्रमाणात ढासळल्याची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी या परिसरात मुंबईतील सर्वाधिक ढासळलेला हवेचा निर्देशांक नोंदविण्यात आला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील हवेचा निर्देशांक ३५५ होता, तर बीकेसी येथे ३०१, माझगाव २६४, बोरिवली ३०२ हवेचा निर्देशांक नोंदविण्यात आला. तर भांडुप, कुलाबा आणि चेंबूर या परिसरात हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीपर्यंत नोंदविण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button