breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाची होणार आठ दिवसांत घोषणा!

  • नवीन चेह-याला संधी की, ये-रे-माझ्या मागल्याची पुनरावृत्ती?
  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष

पिंपरी। (अमोल शित्रे)- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जुळवाजुळव सुरू झाली असतानाच एकेकाळचा ‘बालेकिल्ला’ पिंपरी-चिंचवड पुन्हा काबीज करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी आगामी आठ दिवसांत पिंपरी-चिंचवड शहराध्यपदी नवीन चेह-याची घोषणा करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांचा कार्यकाळ नुकताच संपत आहे. तसेच, मावळ लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करावी, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी वाघेरे-पाटील यांना दिल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वाघेरे-पाटील यांनी एका हॉटेलमध्ये आपल्या विश्वासू सहका-यांची बैठक घेतली. त्यामध्ये लोकसभेच्या दृष्टीने कामाला लागा असे संकेत त्यांनी आपल्या सहका-यांना दिले आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदी काम करण्याबाबत  वाघरे-पाटील उत्सुक राहणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले आहे.

दुसरीकडे, शहराध्यक्षपदी नवीन चेह-याला संधी देवून पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत पक्षाचे नेते अजित पवार गांभीर्याने विचार करीत आहेत. तसेच, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्ती म्हणून माजी आमदार विलास लांडे यांनी पक्ष संघटनेतील भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण, लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजेरी लावून, आगामी काळात शहरातील पक्ष संघटनेत लांडे यांचा दबदबा कायम राहील, असे संकेत दिले होते. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांना लांडे यांचा शब्द ‘प्रमाण’ मानावा लागणार आहे. सध्यस्थितीला माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्‍हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, युवा नेते संदीप पवार, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, उपाध्यक्ष अमित बच्छाव आदींची नावे चर्चेत आहेत.

वास्तविक, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, ज्येष्ठ नगरसेवक भाउसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे आदी प्रमुख नेत्यांच्या विचाराने शहराध्यक्षपदी नवीन चेह-याला संधी देण्यात येईल. पुढील आठवड्यात अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. गेल्याच महिन्यात पवार यांनी विधानसभा मतदार संघनिहाय बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी दिलेल्या सूचनांवर काय अंमलबजावणी झाली? तसेच, शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत खलबते सुरू झाली असून, सत्ताधारी भाजपविरोधात ‘साम-दाम-दंड-भेद’ अशी आक्रमक आघाडी उघडणाऱ्या निष्ठावान आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्याला शहराध्यक्षपदी संधी द्यावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीप्रेमी कार्यकर्त्यांमधून बोलून दाखवली जात आहे.

कारण, महापालिकेत तब्बल ३७ नगरसेवक असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर पातळीवरील आंदोलनात दोन किंवा तीन नगरसेवकही दिसत नाहीत. सत्ताधा-यांविरोधात सर्वसमावेशक भूमिका घेवून आंदोलनांची तिव्रता वाढवणे अपेक्षीत असताना भोसरी, पिंपरी आणि चिंचवडमधील नगरसेवक आपआपल्या परिने गट तयार करुन महापालिकेत कार्यरत आहेत. प्रसंगी सत्ताधाऱ्यांच्या हातात हात घालून काही नगरसेवकांनी पक्षशिस्त आणि पक्षाचे विचार बासनात गुंडाळून ठेवले आहेत. परिणामी, भाजपच्या मतदानाचा टक्का शहरात वाढला असून, बलाढ्य असलेल्या राष्ट्रवादीची अवस्था ‘म्हाता-या वाघा’ सारखी झाली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे देताना पक्षनिष्ठा आणि सर्वसमावेशक भूमिका तसेच सर्वांना सोबत घेवून पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवणा-या कार्यकर्त्याला संधी देणे अपेक्षीत आहे, अशी भूमिका  अनेकांनी  नाव न सांगण्याच्या अटीवर ‘महाईन्यूज’शी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, उस्मानाबाद-बीड- लातूर  येथील विधान परिषद निवडणुकीत झालेल्या परभावानंतर आत्मचिंतन करुन पक्ष संघटनेत तरुणांना संधी देणार…असे दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री आजित पवार ‘मोठ्या साहेबां’च्या सूचनांनुसार नवीन चेह-याला संधी देतात की, जुन्या-अनुभवी आणि मुरब्बी चेह-याला संधी देवून सत्ताधारी भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाशी ‘सेटलमेंट’ करीत  ‘ये-रे-माझ्या मागल्या…’ची पुनरावृत्ती करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दिग्गजांच्या  ‘एन्ट्री’मुळे  इच्छुक अनेकांची ‘विकेट’?

माजी आमदार विलास लांडे सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. मध्यंतरी लांडे यांच्याकडे शहर राष्ट्रवादीची सूत्रे देण्यात येणार…अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर वाढदिवस अभिष्ठचिंत सोहळ्यात शक्तीप्रदर्शन केल्यानंतर, लांडे यांना पक्षाने आता विधान परिषद द्यावी…अशी मागणी समर्थकांसह विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली होती. त्यामुळे पक्ष संघटनेत ताकदीने उतरलेल्या विलास लांडे विधानसभा लढवणार की, विधान परिषदेवर जाणार की जयंत पाटलांच्या मदतीने प्रदेश पातळीवर मोठ्या पदावर दावा करणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्ष नेतेपदी संधी न मिळालेले ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचीही समजूत काढण्यात येणार आहे. परिणामी, शहराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत दिग्गजांची ‘एन्ट्री’ झाल्यास पक्षातील नवोदित इच्छुकांची ‘विकेट’ पडण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button