breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीतील चारही नाटय़गृहे बंद ; प्रेक्षकांची गैरसोय

पिपरी-  शहरात चार नाटय़गृहे आहेत, मात्र दर्जेदार कार्यक्रम व चांगली नाटके पाहण्यासाठी त्यातील एकही नाटय़गृह तूर्त उपलब्ध नाही. दोन नाटय़गृहे बंद आहेत. तर, दोन नाटय़गृहांत नाटकेच होत नसल्याने ते असून नसल्यासारखे आहेत. परिणामी, शहरातील रसिक प्रेक्षकांना आवडीच्या कार्यक्रमांसाठी आता पुण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. शहरातील मध्यवर्ती असणारे चिंचवड नाटय़गृह दोन मे पासून बंद झाल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत संस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. मात्र, त्याच्याशी कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.

चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचे तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मे पासून किमान चार महिने नाटय़गृह बंद ठेवावे लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात हा कालावधी आणखी बराच वाढू शकतो. अशा प्रकारे नाटय़गृहाचे सुशोभीकरण करण्याची मागणी कोणीही केली नव्हती. तसेच, तेथे इतका खर्च होणे अपेक्षितही नाही. मात्र, काही नेते, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने हे काम काढले आहे. त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी अनेकांची गैरसोय होत आहे. कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.

संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर दुरुस्तीसाठी यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन आहे. दुरुस्तीचे काम सुरू करताना येथे बरेच काही सुरू आहे. ‘भुताटकी’ असल्याच्या शंकेने या ठिकाणी काम बंद ठेवून पुरोहिताकडून पूजा घालण्यात आल्याचे प्रकरण भलतेच चर्चेत आले होते. पूर्वीही येथे नाटकांचे प्रयोग होत नव्हते, तसेच चांगले कार्यक्रम अभावानेच होत होते. तरीही मोठय़ा प्रमाणात दुरुस्तीचा खर्च करण्यामागे प्रस्थापितांचे अर्थकारण आहे, हे उघड गुपित आहे.

भोसरीत नाटक कंपन्या नाटकांचे प्रयोग लावण्यास धजावत नाहीत, त्यामुळे केवळ कंपन्यांच्या बैठका, शाळांची संमेलने यासारखे कार्यक्रम तेथे होतात. सांगवीत नव्याने सुरू झालेले निळूभाऊ फुले नाटय़गृह नाटकांसाठी पोषक नाही. जेमतेम ५५० आसनक्षमता असलेले सभागृह असल्याने नाटकांचे प्रयोग लावणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही, अशी भावना या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे शहरात चार नाटय़गृहे असूनही शहरवासीयांना नाटक तसेच चांगल्या कार्यक्रमांचा आनंद लुटण्यासाठी पुण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button