breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पंढरीच्या लागा वाटे / सखा भेटे विठ्ठल //, वैष्णवांचा मेळा विठू माऊलीच्या भेटीस आतूर

  • प्रथे प्रमाणे पहिल्या मुक्कामासाठी पालखी इनामदार वाड्याकडे रवाना 

विकास शिंदे 

देहूगाव  (महा ई न्यूज ) – पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे /  होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी // या अंभगा प्रमाणे वैष्णवांचा मेळा जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्यासह प्रत्येक भाविक संतांच्या मेळा, आपल्या लाडक्या विठू माऊलीची भेट घेण्यासाठी पंढरीची वाट धरा आणि मोक्षाचे अधिकारी व्हा असे जणू काही सांगत होते.

वारकरी मंडळी हातात टाळ चिपळ्या, मृदंगाचा निनाद, विना तुतारीच्या तालावर ताल धरत तुकाराम- तुकाराम नामाचा अखंड जयघोष करीत होते. या हरिनामाच्या जयघोषाने संपुर्ण देहूनगरीत आसमंत खुलून निघाला होता. अशा या भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम  महाराज यांची पालखीचे आज दुपारी अडीचच्या सुमारास पांडुरंगाच्या भेटीसाठी (आषाढी वारीसाठी) पंढरपुरकडे प्रस्थान झाले.

पुण्य उभे राहो आता /संताचे या कारण //पंढरीच्या लागा वाटे /सखा भेटे विठ्ठल // या प्रमाणे समाजातील सर्व धर्म समभावाची व त्यागाचे प्रतिक असलेली भगवी  पताका हवेत उंचच उंच नाचवित पांडुरंगाच्या दर्शनासाठी सामाजिक एकतेचे दर्शन घडवित पंढरीच्या वाटेला लागले आहे.

श्री  संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्यासाठी परदेशी पाहुण्या वारकऱ्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 329 दिंड्या सह वैष्णवांचा मेळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याच्या निमिताने सर्व सामान्यांची देवता असलेली माऊलीचे मनोहारी रूप पाहण्यासाठी वैष्णवांचा जनसागच देहूतून पंढरपूरच्या वाटेवरील इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामाकडे दुपारी चारच्या सुमारास देऊळवाड्यातून प्रदक्षिणा घातल्यानंतर रवाना झाला.

दरम्यानच्या काळात मुख्य मंदिर, वैकुंठगमण मंदिर परिसरातील इंद्रायणी काठ सकाळपासूनच फुलुन गेलेला होता. इंद्रायणी नदीच्या काठावर व मुक्कामाच्या ठिकाणी दिंड्यामध्ये पताकांसह वारक-यांचे खेळ रमले होते, मंदिराच्या आवारात पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडल्यानंतर भाविकांनी अबाव वृध्दांनी  फुगडी, टाळाच्या तालावर पाऊले टाकली जात होती तर काही भाविक उंचच उंच उडी घेत विठ्ठल विठ्ठल असा मंत्र जपत आपला थकवा घालवत होते.

इंद्रायणीचा काठ जणू रंगीबेरंगी फुलांच्या फुलो-याने बहरला होता. खांद्यावर पताका, हातात टाळ घेवून विठ्ठलाचे नामस्मरण करणा-या वारक-यांच्या ध्यानी मनी केवळ विठ्ठलनामाचा ध्यास लागलेला होता. सोहळ्यात सहभागी झालेले भाविक हा विठ्ठलभक्तीचा सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्याचा  प्रयत्न करीत होते.

दिवसभरात वातावरण आल्हाददायक व उत्साही  होते.  वरूण राजाने आपली हजेरी फार काळ लावली नसली तरी सुर्यदेवतेने आपला तेजोपुंज काही ढगांच्या आड  ठेवल्याने वारक-यांना सुख देवून गेला.   या आल्हाददायक वातावरणात वारकरी टाळमृदंगाच्या तालावर ज्ञानोबा तुकाराम  नामाचा जप करीत ताल धरीत होते आणि एकमेकांच्या पाया पडून आपला संत भेटीचा आनंद व्यक्त करीत होते.

पंढरीच्या लोकां नाही अभिमान / पाया पडे जन एकमेका //  तत्पुर्वी परंपरेनुसार प्रस्थान सोहळ्याचे पारंपारीक कार्यक्रम पहाटे पाच  वाजल्या पासून सुरू झाले. पहाटे साडे पाच वाजता संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात जेष्ठ वारकरी व सोहळा प्रमुखांच्या हस्ते महापुजा करण्यात आली. सहा वाजता पांडूरंगाच्या मुख्यमंदिरात पुजा, पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरातील महापूजा, तर वैकुठगमण मंदिरातील महापूजा करण्यात आली. पाहती गवळणी / तवती पालथी दुधानी //  या अभंगाचे निरूपण त्यांनी केले.

सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास श्री  संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना चकाकी दिल्यानंतर इनामदार वाड्यात आणल्या. इनामदार वाड्यात या पादुकांची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार या पादुका पालखीचे मानकरी सोळंकी या गंगा म्हसलेकर  कुंटुंबियांच्याकडे देण्यात आल्या. त्यांनी या पादुका डोक्यावर  घेवून,संबळ, टाळ मृदंग आणि तुतारी या वाद्यांसह वाजत गाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आणल्या. पादुका  मंदिरात आणल्यानंतर पोलीसांनी देऊळवाड्यात मानाच्या दिंड्या, फडकरी,  विणेकरी यांनी आपआपल्या क्रमांकावर सोडण्यास सुरवात केली. पालखी प्रस्थानच्या कार्यक्रमाला दुपारी 3.40 मिनिटे वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला.

या पादुकांची पुजा करून विधीवत पाद्यपूजा,वरूणपूजा आणि कलशपूजा मंत्री महोदयाच्या हस्ते करण्यात आली.  या प्रसंगी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव, राज्य मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, सरपंच पुनम काळोखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विश्वस्त संजय मोरे, रोहीत पवार, उल्हास पवार, भाजपनेते श्रीकांत भारतीय आणि हवेलीच्या तहसीलदार गीता गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

पालखी उचलली जाताच मंदिराच्या आवारात असणाऱ्या वारकऱ्यांनी आपल्या हातातील पताका उंचावून तुतारी,नगारा,ताशांचा गजर करीत हरिनामचा जल्लोश केला.  पालखी भजनी मंडपातुन बाहेर येताच दिंड्यात सहभागी झालेल्या हजारो  वारक-यांमध्ये उत्साह भरला आणि प्रत्येकाच्या मुखातुन आपोआप ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हे बोल बाहेर पडू लागले.

हातातील टाळ विना मृदंग व चिपळ्याच्या तालावर वारकऱ्यांची  पावले थिरकु  लागली. मंदिराच्या आवारात फुगड्यांचा खेळ रंगला, मानवी मनोरे करीत आपला  संत भेटीचा आनंद व्यक्त करीत आसमंतात जणू विठ्ठलच अवतरला आहे की काय असे  प्रत्येकाल वाटत होते. संबळ व चौघड्याच्या तालावर  चांदीची अब्दागिरी घेत सावलीचे रेशमी छत्र, गरूड टक्के,  मानाचा दंड घेऊन  चोपदाराच्या आदेशानुसार बाभूळगावकर आणि अकलुजकरांच्या अश्वासह शाही थाटात पालखी भजनी मंडपातून देऊळ वाड्यात प्रदक्षिणेसाठी  बाहेर पडली. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पालखी भक्तीमय वातावरणात मुख्य मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडली व प्रथे प्रमाणे पहिल्या मुक्कामासाठी इनामदार वाड्याकडे रवाना झाली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button