breaking-newsमनोरंजन

‘नेटफ्लिक्स’ म्हणजे काय ठाऊक नसतानाही जितेंद्रला मिळाली काटेकरची भूमिका

‘नेटफ्लिक्स’ या डिजीटल प्लॅटफॉर्मवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज खूप गाजली. गणेश गायतोंडे, सरजात सिंग, काटेकर ही भूमिकांची नावं प्रेक्षकांच्या तोंडीच बसली आहेत. या सीरिजमध्ये काटेकर हवालदाराची भूमिका मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी याने साकारली आहे. आता या सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी जितेंद्रला काटेकरची भूमिका कशी मिळाली याची रंजक कथा एकदा नक्की वाचा. कारण ही भूमिका मिळाली तेव्हा त्याला नेटफ्लिक्स म्हणजे काय हेसुद्धा ठाऊक नव्हतं.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्रने हा किस्सा सांगितला. ”मी माझ्या एका मित्रासोबत गप्पा मारत नाक्यावर उभा होतो. खूप वेळ गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही तिथे जवळच राहत असलेल्या त्याच्या मित्राच्या घरी गेलो. मंदार गोसावी असं त्याचं नाव होतं. तिथे त्याच्या पत्नीने स्वयंपाक केला. आम्ही जेवलो, गप्पा मारल्या आणि तिथून निरोप घेताना मंदारने सांगितलं की तो नेटफ्लिक्सवरील एका सीरिजसाठी कास्टिंग करतोय. मला नेटफ्लिक्स म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवाने हे सीरिजची निर्मिती करत आहेत, असं त्याने मला सांगितलं. त्याला म्हटलं की ही दोन नावं फार महत्त्वाची आहेत. त्याला म्हटलं की ऑडिशनला जाऊया. पण कोणत्या भूमिकेसाठी गरज आहे हे त्याला विचारलं. तर तो हवालदाराच्या भूमिकेसाठी म्हणाला. त्याला म्हटलं की हवालदार नको. मराठी कलाकारांना अशाच भूमिका दिल्या जातात. मराठीतली मोठी नावं सोडली तर इतरांना अशा दुय्यम भूमिकाच दिल्या जातात असं त्याला म्हटलं. तो म्हणाला की भूमिका चांगली आहे, तू ये. मी गेलो, ऑडिशन दिलं आणि काटेकरच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली.”

”विक्रमादित्य मोटवाने यांना भेटलो तेव्हा त्यांनी सीरिजसाठी सलग तीन महिने मागितले. निखिल महाजन म्हणून माझा एक मित्र आहे, मी त्याच्याशी याबद्दल बोललो. त्याच्यासोबत मी एका चित्रपटात काम करत होतो. माझ्या सीरिजसाठी त्याने स्वत:चा चित्रपट पुढे ढकलला. नेटफ्लिक्स काय आहे हे त्याने मला समजावून सांगितलं. माझं अकाऊंट उघडून दिलं. तेव्हा मला नेटफ्लिक्सविषयी माहिती मिळाली,” असं त्याने सांगितलं.

जितेंद्रने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button