breaking-newsपुणेमहाराष्ट्र

नवरात्रोत्सवात उपवासाच्या खाद्यपदार्थाना स्वस्ताईची गोडी

गेल्या वर्षीपेक्षा दहा ते पंधरा टक्क्यांनी दर उतरले; उत्तर प्रदेशातून कुट्टू, शिंगाडय़ाची आवक

पुणे : नवरात्रोत्सवात अनेक जण नऊ दिवसांचा उपवास करतात. या काळात शेंगदाणा, साबुदाणा, भगर, राजगिरा अशा उपवासाच्या पदार्थाना मोठी मागणी असते. यंदा महाराष्ट्रासह परराज्यात उपवासाच्या खाद्यपदार्थाचे उत्पादन चांगले झाले असून गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात आवकही चांगली होत आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या खाद्यपदार्थाच्या दरात दहा ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे.

भुसार बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडून उपवासाच्या खाद्यपदार्थाना चांगली मागणी आहे. महात्मा फु ले मंडई भाग तसेच नाना पेठेतील भुसार बाजारातील किरकोळ विक्रेत्यांक डे उपवासाचे खाद्यपदार्थ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात नाशिक, ठाणे तसेच रायगड भागातून सध्या दररोज ७ ते १० ट्रक भगरीची आवक होत आहे. तामीळनाडूतील सेलम जिल्हय़ातून शेंगदाण्याचे १० ते १२ ट्रक बाजारात दाखल होत आहेत. सुपर फाइन, मिल्क व्हाइट, साधा अशा प्रकारच्या शेंगदाण्यांना चांगली मागणी आहे. कर्नाटक घुंगरू जातीच्या शेंगदाण्याची आवक सुरू झाली आहे, तसेच गुजरातमधील शेंगदाणा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून १० ते १५ ट्रक एवढी शेंगदाण्याची आवक सुरू आहे. उत्तर भारतातून शिंगाडा आणि कुट्टू पदार्थाची आवक वाढली आहे. उपवासाची दशमी, पुरी, भाजणी, थालिपीठ तयार करण्यासाठी भगरपीठ, राजगिरा, साबुदाणा, कुट्टूपासून तयार करण्यात आलेल्या पिठाला मोठी मागणी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भगरीच्या उत्पादनात वाढ झाल्याने दरात यंदा पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी भगरीचा प्रतिकिलोचा दर शंभर रुपये किलो असा होता. महिन्याभरापूर्वी साबुदाण्याचे दर तेजीत होते. नवरात्रात साबुदाण्याची आवक वाढल्यानंतर दर कमी झाले आहेत.

यंदाच्या वर्षी घाऊक बाजारात उपवासाच्या खाद्यपदार्थाना अपेक्षेएवढे मागणी नाही. भगर, साबुदाणा, शेंगदाण्याची आवक चांगली होत आहे. उपवासाच्या खाद्यपदार्थाच्या दरात साधारणपणे दहा टक्के घट झाली असल्याचे घाऊक बाजारातील व्यापारी रवींद्र नहार यांनी सांगितले.

उपवासाच्या पीठांचे दर

*  राजगिरा पीठ १८० रुपये

* साबुदाणा पीठ १४० रुपये

* भगर पीठ    १६० रुपये

* शिंगाडा पीठ   ४०० रुपये

उपवासाच्या खाद्यपदार्थाचे प्रतिकिलोचे दर

* राजगिरा-     ६८ ते ७० रुपये

* साबुदाणा-    ४० ते ४५ रुपये

* भगर-       ५५ ते ६० रुपये

* शेंगदाणा-     ७५ ते ९० रुपये

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button