breaking-newsपुणेमहाराष्ट्र

धक्काबुक्कीच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे १०० ‘बॉडी कॅमेरे’!

शहरातील १७ प्रमुख चौकांमध्ये कारवाईला सुरुवात

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांबरोबर भर चौकात हुज्जत घालून पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. यंदाही वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील १७ प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी ‘बॉडी कॅमेरे’ दिले आहेत. वाढत्या धक्काबुक्कीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून आणखी १०० ‘बॉडी कॅमेरे’ खरेदी करण्यात येणार आहेत.

पुणे शहरात बेशिस्त वाहनचालकांकडून होणाऱ्या नियमभंगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक नियंत्रक दिव्याकडे (सिग्नल) दुर्लक्ष करणे, पादचारी मार्गावर (झेब्रा क्रॉसिंग) वाहन उभे करणे, पदपथावर वाहने लावणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, भरधाव वाहन चालवणे, मोबाइलवर संभाषण करत तसेच मद्य पिऊन वाहन चालविणे अशा प्रकारचे नियमभंग वाहनचालकांकडून सर्रास केले जातात.

शहरातील प्रमुख चौकात १२४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. प्रमुख चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. बऱ्याचदा शहरातील प्रमुख चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यात येते. वाहनचालक कारवाईस विरोध करतात. दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात येते. अशा घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून महिन्याभरापूर्वी १७ बॉडी कॅमेरे खरेदी करण्यात आले, असे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून ‘बॉडी कॅमेऱ्या’द्वारे कारवाई करण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांच्या शर्टच्या पहिल्या बटणाजवळ हा छोटा कॅमेरा बसविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे १७ कॅमेरे पोलिसांना मिळाले आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून कारवाईस विरोध करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना ‘बॉडी कॅमेरा’ देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी घेतला होता, असेही सातपुते यांनी सांगितले.

बॉडी कॅमेऱ्याद्वारे करण्यात आलेले चित्रण पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून आणखी १०० बॉडी कॅमेरे खरेदी करण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत १०० कॅमेरे दाखल होतील.

– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button