breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

देशात सांप्रदायिक विचाराचा ज्वर -पवार

संघाचे आधी कौतुक, आता टीका; राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनादिन

आठवडय़ापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी, संघ विचारसरणीवर आता जोरदार आसूड ओढले. देशात सांप्रदायिक विचाराचा ज्वर आज पाहायला मिळत आहे, समाजाला एकसंघ न ठेवणारी विखारी पद्धत संसदेत सध्या पाहायला मिळत आहे, अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २०व्या स्थापनादिनानिमित्त सोमवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. या वेळी संसदेत भगवे विचार मांडणाऱ्या लोकांची संख्या जास्त असेल, त्यात गंभीर स्वरूपाचे खटले जास्त असणारे लोक असणार आहेत, असे सांगत त्यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालावरही भाष्य केले. मालेगाव बॉम्बस्फोटामधील आरोपीही संसदेत असणार ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादाचा प्रखर विचार मांडला आणि पाकिस्तानाला लक्ष्य केले. परंतु ते देशहिताचे नव्हते. राष्ट्रहित जपले पाहिजे, ही भावना त्यामुळे लोकांच्या मनात निर्माण झाली. ती रुजवण्यात भाजप यशस्वी झाले असेही शरद पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुका झाल्या, त्यात मतदान यंत्रांबाबत शंका आहे. त्यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा केली. मतदान केंद्रावर गेल्यावर दोन ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली की, तिथे काही गडबड नाही. तर तिसऱ्याच ठिकाणी, जो अधिकारी बसला होता तिथे गडबड आहे, तिथे काय झाले हे आपल्याला कळले नाही. या संदर्भात दिल्लीत बैठक घेऊन तज्ज्ञांकडून वस्तुस्थिती जाणून घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू या, पक्षाची ताकद वाढवूया आणि महाराष्ट्रात पुन्हा आघाडीची सत्ता आणू या, असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

लोकसभेची चर्चा आता बस्स झाली. तो निकाल कसा लागला कुणी लावला यावर चर्चा नको, विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश कसे मिळेल याकडे लक्ष द्या, मतदान यंत्रांना दोष देत आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button