breaking-newsपुणे

ताम्हिणी घाटात थरकाप..

  • निर्जन परिसरात सात महिन्यांत आठ खून

पुणे : ताम्हिणी घाटातील निर्जनता गुन्हेगारांच्या पथ्यावर पडली आहे. गेल्या सात महिन्यांत ताम्हिणी घाट परिसरात आठ खून झाल्याचे उघडकीस आले असून पुणे जिल्ह्य़ातील लोणावळा, खंडाळा, तसेच ताम्हिणी घाटातील निर्जन भागात गुन्हेगारी कृत्ये केली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी या भागातील गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

किरकोळ वाद, वैमनस्य तसेच प्रेम प्रकरणातून अपहरण करून पुणे जिल्ह्य़ातील निर्जन भागात खून करण्याच्या घटना घडत आहेत. आठवडय़ापूर्वी कोकण भागातील दोघांचे आर्थिक वादातून अपहरण करून त्यांना जाळण्यात आले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांची मोटार जाळण्यात आल्याची घटना ताम्हिणी घाटात घडली होती. २२ जून रोजी मुंढवा भागातील एका महिलेचा अनैतिक संबंधातून ताम्हिणी घाटात खून करण्यात आला. या प्रकरणात मुंढवा पोलिसांनी एकाला अटक केली. समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. कर्जबाजारी झालेल्या या आरोपीने महिलेचा ताम्हिणी घाटात खून केल्याचे उघडकीस आले होते.

याबाबत पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक  संदीप पाटील म्हणाले,की पुणे जिल्ह्य़ाचा विस्तार मोठा आहे. घाटमाथ्यावरील लोणावळा, खंडाळा तसेच ताम्हिणी घाट परिसरात बेवारस अवस्थेत मृतदेह सापडतात. बहुतांश घटनांमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा खून करून मृतदेह निर्जन भागात टाकून देण्यात आल्याचे आढळून आले आहे.

ताम्हिणी, वरंध घाट

निर्जन आहेत. घाट रस्त्यांच्या भागात दाट जंगल आहे. अशा ठिकाणी अपहरण करून आणलेल्या व्यक्तीचा खून करण्यात येतो. ज्या व्यक्तीचा खून झालेला असतो, ती व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर याबाबतची तक्रार त्याच्या नातेवाइकांकडून स्थानिक पोलीस ठाण्याकडे देण्यात येते.

पुणे जिल्ह्य़ातील निर्जन भागांत ३५ मृतदेह

पुणे जिल्ह्य़ातील दुर्गम भागात गेल्या सात महिन्यात ३५ मृतदेह सापडले आहेत. बहुतांश घटना खुनाच्या असून त्यापैकी १३ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. जिल्ह्य़ातील अनेक दुर्गम भाग दरी खोऱ्यांनी वेढलेले आहेत. घनदाट जंगलात, नदीपात्रातील निर्जन भागात, डोंगररांगात मृतदेह सापडले आहेत. पोलिसांकडून अशा प्रकरणांमध्ये खून तसेच पुरावा नष्ट करणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वैमनस्यातून खून करून पुणे जिल्ह्य़ातील निर्जन भागात मृतदेह टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांकडून जिल्ह्य़ातील दुर्गम भागात गस्त घालण्यास सुरूवात करण्यात आली आहे. दुर्गम भागाकडे जाणारे रस्ते, घाट तसेच निर्जन भागात नाकाबंदी करण्यात येत असून संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

– संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पोलीस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button