breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बलात्कार: ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षकांनीच लावला ‘सरस्वती’च्या नावाला कलंक

  • हराळी (ता. लाेहारा, जि. उस्मानाबाद) येथील धक्कादायक प्रकार 
  • नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
  • संस्थेची सीबीआयमार्फत चौकशीची संभाजी ब्रिगेडची मागणी

पिंपरी (महा-ई-न्यूज) – उस्मानाबाद जिल्ह्यामधील लोहारा तालुक्यातल्या हराळी गावातील ज्ञानप्रबोधिनी आश्रम शाळेत अनाथ अल्पवयीन मुलींवर शिक्षकांनीच अत्याचार केल्याची मालिका समोर येऊ लागली आहे. याच आश्रमशाळेतील एका अल्पवयीन मुलीवर पाच शिक्षकांनी वेळोवेळी अत्याचार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संस्था संघ विचाराने प्रेरीत असल्याने जाणिवपूर्वक संस्थाचालकाला भाजप सरकार पाठिशी घालत आहे. गुन्हेगारीचे समर्थन करणा-या संस्थाचालकाला सहआरोपी करुन अटक करा, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराचा पिंपरीत निषेध केला.

पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आज रविवारी सकाळी अकरा वाजता या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी बिग्रेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, शहराध्यक्ष प्रवीण कदम, माजी नगरसेवक मारुती भापकर, सुनील साळुंके, रफिक कुरेशी, साहेबराव साळुंके, किरण माने, अशोकराव सातपुते, निलेश मुसळे, सुरज साळुंके, धनंजय घावटे, केशवराव पाटील, सतिश काळे, सतीश घावटेमर्दान, मोहसिन शहा, तेजस गवई, रफिक सय्यद,अक्षय मरबे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार म्हणाले की, सध्या कुठेच महिला, मुली सुरक्षित नाहीत. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कुचकामी ठरत आहे. सतत घडणाऱ्या घटनेला १०० टक्के सरकार जबाबदार आहे. या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा. १४ वर्षाच्या चिमुरडीवर मागील दोन वर्षापासून अनेकदा बलात्कार झाले. तरीही संस्था चालकाच्या लक्षात ही बाब आलेली नाही. याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यांनी आरोपींना आजपर्यंत पाठीशी घातले गेल्याने त्यांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे.

शिक्षकी पेशाला आणि शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. या संस्थेला वसतीगृहाची मान्यता नसताना शेकडो अनाथ आणि निराधार मुलांना डांबून ठेवले गेले. आम्ही खुप मोठी समाजसेवा करीत असल्याचे दाखवून कोट्याधीश रुपयांच्या देणग्या गोळा केल्या जात आहेत. हा संस्था चालक तिथे ऐशोआरामी जीवन जगत आहेत.  ही अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीना कठोर शासन होत नाही. तोपर्यंत संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही. असा इशारा पवार यांनी दिला आहे.

शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी अत्याचार ग्रस्त मुलीेचे शासनाने तात्काळ पुनर्वसन करून तिला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. संस्थेची कार्यकारिणी बरखास्त करून प्रशासक नेमावे. या प्रकरणाची CBI मार्फत चौकशी करावी, अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button