breaking-newsआंतरराष्टीय

चीनच्या सीमेजवळ 44 रस्ते बांधणार

  • 21 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित

नवी दिल्ली- चीनच्या सीमेजवळील संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या 2100 किलोमीटरच्या परिसरामध्ये 44 रस्ते बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत पंजाब आणि राजस्थानमध्येही हे रस्ते असणार आहेत, असे केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या वार्षिक अहवालामध्ये म्हटले आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला गेला. संघर्षाच्या काळात सीमेजवळ सैन्याच्या हालचाली अधिक सोयीच्या व्हाव्यात या दृष्टीने या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

भारत आणि चीनच्या सीमेदरम्यान जम्मू आणि काश्‍मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत सुमारे 4 हजार किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे. चीनकडून या सीमाप्रदेशात मोठे प्रकल्प सुरु केले आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

2017 मध्ये चीनच्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय सैन्याने आक्षेप घेतल्यावर डोकलाममधील त्रिकोणी भूप्रदेशामध्ये भारत आणि चीनी सैन्य आमने सामने उभे ठाकले होते. 28 ऑगस्ट रोजी चीनने बांधकाम थांबवणे आणि दोन्ही सैन्यांनी माघार घेण्याचे सहमतीने ठरल्यावर ही कोंडी सुटली होती. भारताच्यावतीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बांधण्यात येणाऱ्या या 44 रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 21 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे रस्ते जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या 5 राज्यांमध्ये बांधले जानार आहेत. याशिवाय पाकिस्तानच्या सीमेजवळ राजस्थान आणि पंजाबमध्ये 2,100 किलोमीतरचे रस्ते बांधण्यात येणार असून त्यासाठी 5,400 कोटी रुपये खर्च येणार आहे.

या बांधकाम प्रकल्पांसाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सविस्तर प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार केला जात आहे. राजस्थानमध्ये अंदाजे 3,700 कोटी रुपयांचे आणि पंजाबमध्ये अंदाजे 1,750 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या रस्त्यांमुळे दुर्गम भागातील सीमेवर सैन्याच्या हालचाली सुकर होणे अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button