चापेकर स्मारक समितीला 5 कोटींचा निधी देणार – नितीन गडकरी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भटक्या-विमुक्तांच्या मुलांना प्रशिक्षण, शिक्षण आणि कला-कौशल्य आत्मसात करण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य होत असेल तर माझ्यातर्फे क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती पुनरुत्थान समरसता गुरूकुलमला या वर्षी 5 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
या संस्थेच्या भूमिवंदन, गोमाता प्रदान कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीष प्रभुणे आदी यावेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, या संस्थेसाठी माझ्याकडून या वर्षी पाच कोटी रुपये देण्यात येतील. त्यासाठी लागणारी जागा महापालिकेकडून भाडेतत्वावर घेण्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 वर्षाच्या करारावर महापालिका किंवा प्राधिकरणाची जागा सहज उपलब्ध होईल. भटक्या-विमुक्तांच्या मुलांचा विकास साधण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण, शिक्षण तसेच त्यांच्यातील कला-कौशल्य वाढविण्याचा चांगला प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून होत असेल तर त्याचा मला अभिमान आहे. एक ग्रोथ इंजिन म्हणून हा प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे. या भावनेतून काम केल्यास हा प्रकल्प भटक्या-विमुक्तांच्या मुलांचं जीवन बदलवणारा ठरेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.