breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चाकणमध्ये खलिस्तानवादी तरुणाला अटक

पुणे –  दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथे पिस्तुलासह अटक केलेला पंजाबमधील तरुण, खलिस्तानवादी असल्याचे तपासात समोर आले आहे. हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (वय 42, रा़  बेल्लारी, कर्नाटक, मूळ गाव मगलमाजरा, पो़  सिहोनमाजरा, जि. रोपड, पंजाब) असे त्याचे नाव आहे. 

दहशतवादविरोधी पथकाला 2 डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाईक याला चाकण येथे सापळा रचून पकडण्यात आले होते. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल व 5 काडतुसे आढळून आली होती. त्यानुसार मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाच्या  पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने अधिक तपासासाठी 10 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली होती. या दरम्यान एटीएसने केलेल्या तपासात तो स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या तयारीसाठी परदेशातील, तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी विचारसरणीच्या लोकांसोबत संपर्कात असून, देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत असल्याचे समोर आले आहे. दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या विरोधात बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) अधिनियमान्वये (यूएपीए) कारवाई केली आहे. त्याच्या एका साथीदाराला पंजाब येथील सरहद पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करीत असताना नाईक हा शस्त्रास्त्र जमविणे; तसेच भारतात दहशतवादी कारवाया करण्याकरिता तरुणांना भडकवणे यासाठी इंटरनेट व सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. तो स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता आहे. स्वतंत्र खलिस्तान निर्मितीच्या तयारीकरिता तो देशांतर्गत व पाकिस्तानसह परदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले आहे.

त्याने साथीदारांसोबत मिळून दहशतवाद्यांची टोळी बनवून, भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे मिळविली व दहशतवादी कृत्ये करण्याची तयारी केली, पुरावा उपलब्ध झाल्याने, त्याच्याविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध अधिनियम (यूएपीए) कलम लावण्यात आले आहे. त्यास सोमवारी शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 17 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button