breaking-newsक्रिडा

कुमारांचा दुहेरी सुवर्णवेध

उदयवीर सिंगच्या कामगिरीच्या बळावर वैयक्तिक आणि सांघिक पदके

षोड्शवर्षीय उदयवीर सिंगच्या ‘लक्ष्यवेधी’ कामगिरीच्या बळावर जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील कुमारांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात गुरुवारी भारताच्या खात्यावर वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदकाची भर पडली.

उदयवीरने वैयक्तिक प्रकारात ५८७ गुण (प्रीसिजनमध्ये २९१ आणि रॅपिडमध्ये २९६)  मिळवून सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेच्या हेन्री लेव्हेरेटला (५८४ गुण) रौप्य आणि कोरियाच्या ली जाईक्योनला (५८२ गुण) कांस्यपदक मिळाले. भारताच्या विजयवीर सिधूला ५८१ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर राजकन्वर सिंग संधूला (५६८ गुण) २०वा क्रमांक मिळाला.

भारताच्या तीन स्पर्धकांची गुणसंख्या १७३६ झाल्यामुळे सांघिक सुवर्णपदकावरही नाव कोरता आले. चीनला (१७३० गुण) रौप्यपदक आणि कोरियाला (१७२१ गुण) कांस्यपदक मिळाले.

वरिष्ठ गटात पुरुषांच्या स्कीट पात्रता फेरीत ४९ गुण मिळवणाऱ्या शीराज शेखरे भारताकडून सर्वोत्तम कामगिरी साकारताना आठवे स्थान मिळवले. अंगडवीर सिंगला (४७ गुण) ६९वा क्रमांक मिळाला, तर मैराज अहमदला (४१ गुण) ७९वा क्रमांक मिळाला. भारताचे सांघिक गुण १३७ झाल्यामुळे १६वे स्थान मिळाले.

२५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात भारताला एकही पदक मिळाले नाही. गुरप्रीत सिंगला ५८१ गुणांसह १०वे स्थान मिळाले, तर लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या विजय कुमारला ५७६ गुणांसह २४वे स्थान मिळाले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अनिश भानवाला याला २५वे स्थान मिळाले. भारताने १७३३ सांघिक गुण मिळवल्याने चौथे स्थान मिळाले.

भारताने आतापर्यंत नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि सात कांस्य अशा एकूण २४ पदकांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साकारली आहे. या प्रतिष्ठेच्या पात्रता स्पर्धेतून भारताने आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील दोन स्थाने निश्चित केली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button