breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

काँग्रेस नेत्यांची आज तातडीची बैठक

 

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशाचा मुद्दा गाजणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे उद्याच्या बैठकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. मात्र काही जागांवर वाद निर्माण झाला आहे. मागील निवडणुकीतील जागावाटपाच्या सूत्रानुसार अहमदनगर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेला आहे. मात्र या वेळी राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा, अशी पहिल्या बैठकीपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे काँग्रेसचे नेते मागणी करीत होते.

दिल्लीपर्यंत प्रयत्न करूनही नगरची जागा मिळत नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरचे भाजपचे उमेदवार म्हणून त्यांची केंद्रीय निवड समितीकडे शिफारस केल्याचे जाहीर केले.

काँग्रेसच्या एका आघाडीच्या व महत्त्वाच्या नेत्याच्या मुलानेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नगर जिल्ह्य़ातील पक्षांतर्गत गटबाजीनेही डोके वर काढले आहे. या पाश्र्वभूमीवर उद्या प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर समितीची बैठक होणार आहे. मतदारसंघनिहाय लोकसभा निवडणुकीची तयारी, तसेच अन्य समविचारी पक्षांबरोबर समझोता करण्याबाबत काय प्रगती झाली आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशाचा मुद्दाही चर्चेला येणार आहे, असे सांगितले जाते. उद्याच्या बैठकीत सुजय विखे हा वादाचा विषय ठरणार असून, त्यावरून राधाकृष्ण विखे यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आणि नगर जिल्ह्य़ातील विखे घराण्यांचे राजकीय प्रतिस्पिर्धी असलेले बाळासाहेब थोरात यांनी, विखे यांनी सुजय यांचा भाजपप्रवेश रोखायला हवा होता, असे विधान करून या वादाला आधीच तोंड फोडले आहे.

‘सार्वजनिक ठिकाणांवरील सरकारी जाहिराती काढा’

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे पेट्रोल पंप, एसटी बसेस, बस थांबे इत्यादी ठिकाणच्या सरकारी जाहिराती काढून टाकण्याचे सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चपासून लागू झालेली आहे. असे असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपांसहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. याचा जाब निवडणूक आयोगाने सरकारला विचारून संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, असे लेखी निवेदन सावंत यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button