breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आरटीओ’च्या हतबलतेमुळे नागरिकांच्या कामांची रखडपट्टी

अत्यल्प मनुष्यबळामुळे कामकाज विस्कळीत; दसऱ्याच्या नव्या वाहनांच्या नोंदणीलाही फटका

मुळातच ३० टक्के अधिकारी कमी असताना तब्बल १७ अधिकाऱ्यांचे निलंबन आणि दोन अधिकाऱ्यांच्या निवृत्तीमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या मनुष्यबळाच्या दृष्टीने जवळपास रिकामे झाले आहे. अशा स्थितीत कार्यालय अक्षरश: हतबल झाले असून, कामकाज विस्कळीत होऊन नागरिकांशी संबंधित कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने खरेदी होणाऱ्या नव्या वाहनांच्या नोंदणीलाही त्याचा फटका बसतो आहे. परिवहन विभागाकडून मनुष्यबळ उपलब्ध न झाल्यास आरटीओतील अनेक कामे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे आरटीओ कार्यालयाचा व्याप मागील काही वर्षांमध्ये वाढला आहे. शहरात दररोज एक ते दीड हजार नव्या वाहनांची नोंद केली जाते. शिकाऊ वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या दिवसाला पाचशेच्या आसपास आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या योग्यता तपासणीसाठीही रोजच मोठय़ा प्रमाणावर वाहने प्रतीक्षेत असतात. अशा स्थितीमध्ये शंभरहून अधिक मोटार वाहन निरीक्षक आणि सहायकांची आवश्यकता असताना निम्म्याहून कमी अधिकारी पुणे कार्यालयाला देण्यात आले होते. वाहन तपासणीच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यातील १७ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. याच कालावधीत दोघे निवृत्त झाले. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळावर कामाचा ताण वाढला आहे.

सद्य:स्थितीत वाहन नोंदणी, परवाना चाचणी, योग्यता चाचणी आदी कामांची रखडपट्टी सुरू झाली आहे. सध्या दसऱ्याच्या निमित्ताने नव्या वाहनांची खरेदी सुरू झाली आहे. दसऱ्याच्या आधी एक ते दोन दिवस शहरात दररोज २५ ते ३० हजार नव्या वाहनांची खरेदी होत असते. या सर्व वाहनांच्या नोंदणीचे कामही या दोन ते तीन दिवसांत करावे लागणार आहे.

मात्र, मनुष्यबळाअभावी मोठय़ा प्रमाणावरील वाहनांची नोंदणी करून घेणे अवघड आहे. त्यामुळे नोंदणीच्या कामाला मोठा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहरांत वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.

त्यामुळे पुणे आरटीओकडून सर्वाधिक महसूल शासनाला मिळत असतानाही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नाही. त्याचा फटका थेट नागरिकांना बसत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

‘तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार’

सध्या तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया आरटीओतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. मोटार वाहन निरीक्षक आणि सहायकांची एकूण १०३ पदे मंजूर आहेत. त्यातील निम्मी पदे भरली नव्हती. पदे भरण्याबाबत वेळोवेळी मागणी नोंदविण्यात आली. आता निलंबनामुळे आरटीओ जवळपास रिकामे झाले आहे. त्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेळ थांबून काम करावे लागत आहे. त्यातच अधिकाऱ्यांना उपयुक्त कोणत्याही सुविधा नाहीत. आरटीओमध्ये नवे तंत्रज्ञान आणले जात असताना त्याचे प्रशिक्षणही दिले जात नाही. सद्य:स्थिती लक्षात घेता नागरिकांच्या कामांचा विलंब वाढत जाणार असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

पुणे आरटीओमध्ये वाहन निरीक्षकांची संख्या अत्यल्प झाली आहे. वाहन नोंदणी, वाहन परवाना चाचणी, योग्यता प्रमाणपत्र, भरारी पथक आदी सर्वच कामांसाठी मनुष्यबळ कमी पडते आहे. त्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांची कामे रखडण्यावर झाला आहे. कामकाज सुरळीत होण्यासाठी इतर आरटीओमधून पुणे कार्यालयात प्रतिनियुक्तीवर अधिकारी बोलविण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या परिवहन विभागाने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या काही दिवसांत कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.   – राजू घाटोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button