breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तसाहेब ‘धृतराष्ट्राची’ भूमिका सोडा, अन्यथा शहर कचऱ्यात जाईल! 

  • शिवसेनेच्या वतीने कचरा व्यवस्थापनावर चर्चासत्र 
  • विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडली मते

पिंपरी, (महाईन्यूज) – महापालिका कचरा व्यवस्थापनावर वर्षाकाठी कोट्यावधी रुपये खर्च करते. मात्र, त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होत नाही. शहर स्वच्छतेला हातभार लावण्यात नागरिक देखील कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने वेळीच कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, त्याची हाताळणी व विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी, आयुक्तांनी धुतराष्ट्राची भूमिका सोडावी अन्यथा शहर कचऱ्यात जाईल, अशी भीती विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज गुरुवारी (दि. 18) चिंचवड येथे व्यक्त केली. शहराचे पालक म्हणून आयुक्तांनी या प्रश्‍नी जातीने लक्ष घालण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

गेली काही दिवस पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा प्रश्न गाजत आहे. दोन-दोन कंत्राटदार नेमूनही शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. त्यावरुन आंदोलने होत आहेत. महापालिका सभागृहात संताप व्यक्त होत आहे. कचरा व्यवस्थापनात महापालिका कुठे कमी पडते का, याचा शोध आणि बोध घेता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा समस्या आणि व्यवस्थापन या विषयावर शहर शिवसेनेच्या वतीने नागरिकांचे चर्चासत्र घेण्यात आले. चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात झालेल्या या चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

लोकशाही बचाव समितीचे समन्वयक मानव कांबळे, डॉ. वैशाली गोरडे, जितेंद्र निखळ, किरण येवलेकर, सुहास जोशी, कष्टकरी पंचायतीचे काशिनाथ नखाते, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर, महिला शहर संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, युवा सेनेचे जितेंद्र ननावरे, सोसायटीचे प्रतिनिधी विवेक तितरमारे, झोपडपट्टीवासियांचे प्रतिनिधी अमृता देडे, संतोष सौंदणकर, अनिता तुतारे, सरिता साने, बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते.महापालिकेचे प्रतींनिधी डॉ. अनिल रॉय, डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.

लोकशाही बचाव समितीचे मानव कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड सारख्या स्मार्ट सिटीमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण व्हावी, ही मोठी दुर्देवाची बाब आहे. महापालिकेचे कचरा संकलन करणारे ठेकेदार शहराच्या एकूण रचनेप्रमाणे कचऱ्याच्या गाड्या उपलब्ध करू शकले नाहीत. ठेकेदारांना सर्वसामान्य नागरिकांशी काहीही देणेघेणे नाही. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची कुचराई होत चालली आहे. 2017 पासून ही कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविताना आधी एका ठेकेदाराला काम दिले. नंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या सोयीच्या नवीन ठेकेदारास टेंडर दिले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला  आहे. कचऱ्याच्या समस्येला संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. शहराची जबाबदारी जशी महापालिकेची आहे, तशी सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलीही तेवढीच आहे. त्यामुळे सजग नागरिकांनी आता जागृत होणे आवश्‍यक आहे.

डॉ. वैशाली गोरडे म्हणाल्या की, ओला आणि सुका कचऱ्याचे घरच्या घरीच योग्य व्यवस्थापन झाले तर कचऱ्याचे ढिगच्या ढिग डम्पिंगला जाणार नाहीत. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती घातक कचरा सुया, सिरिंज, जुनी औषधे, इंजेक्‍शनच्या न उकळलेल्या सुया, डायपर्स, सॅनिटरी पॅड्‌स, औषध-उपचारांसाठी वापलेला कापूस, बॅटरी सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्युबलाइटस्‌, कीटकनाशके, जंतुनाशके हा विषारी कचरा वेगळा ठेवला पाहिजे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कचरा समस्या शहरातील गंभीर समस्या बनली आहे. त्यावर तोडगा काढण्याचे महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. कचरा व्यवस्थापन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याची माहिती डॉ. रॉय यांनी चर्चासत्रात दिली.

या वेळी शहरातील सामाजिक, पर्यावरण, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच सोसायटीचे पदाधिकारी, प्रतिनिधी, कचरा वेचक प्रतिनिधी चर्चासत्रास उपस्थित होते. पर्यावरणाचे विकास पाटील, किरणयेवलेकर, सुहास जोशी, विवेक तितरमारे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक योगेश बाबर यांनी केले. सूत्रसंचालन अनिता तुतारे यांनी केले. शिवसेनेच्या महिला शहर संघटिका उर्मिला काळभोर यांनी आभार मानले.

शिवसेना स्वच्छतेत पुढाकार घेणार – चिंचवडे

पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा समस्येने रौद्र रूप धारण केले आहे. कचरा हा गुंतागुंतीचा आणि गंभीर प्रश्न बनत चालला आहे. कचरा व्यवस्थापन नीट होत नसल्याने आज संपूर्ण शहरात शिवसेना शिवसैनिकांच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाद्वारे प्रभागनिहाय आरोग्य अधिकार्‍यांमार्फत समस्या साडविणार आहे. असे स्पष्टीकरण शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी यावेळी व्यक्त केले. कचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचे प्रयत्न त्याचबरोबरीने नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांकडून तक्रारींचा भडीमार 
चर्चासत्रास उपस्थित नागरिकांकडून कचरा समस्येबाबत तक्रारी मागविल्या होत्या. त्यावर नागरिकांनी अक्षरशः तक्रारींचा भडीमार केला. शहराच्या विविध भागातील कचऱ्याशी संबंधित सुमारे दीडशेहून अधिक तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या. शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य अधिकाऱ्यांकडून या तक्रारी प्रभागनिहाय सोडविल्या जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button