breaking-newsपुणे

आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत मिळविण्यासाठी सादरीकरणाची घाई

  • टेमघर धरण दुरुस्ती; दिवाळीनंतर केंद्रीय समिती येणार

पुणे – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रीसर्च स्टेशन -सीडब्लू अ‍ॅन्ड पीआरएस) या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या धरणाच्या दुरुस्तीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समितीने नुकताच पाहणी दौरा पूर्ण केला असून पुढील दौरा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणार आहे. दरम्यान, टेमघरच्या दुरुस्तीसाठी खासगी आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून कंपनीच्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यासाठी दिवाळीनंतर केंद्रीय समितीला पुन्हा पाचारण करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत टेमघर धरणात ०.२४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ६.५३ टक्के एवढा पाणीसाठा असून हे पाणी पुणे शहर आणि सिंचनासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येत आहे. डिसेंबरपासून पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेमघर धरणाची गळती थांबविण्याचे आणि धरणाच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे धरणातून होणारी पाण्याची मोठी गळती थांबली आहे. परंतु, धरण पूर्णपणे सक्षम करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, धरणे आणि त्यामधील गळती याबाबत दिल्ली येथे मागील महिन्यात एक बैठक पार पडली. बैठकीत तामिळनाडू येथील कदम पराई या धरणाची गळती रोखण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात आले, त्याबाबत चर्चा करण्यात आली. हेच तंत्रज्ञान टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी वापरल्यास त्याचा फायदा होईल, असे मत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या पाश्र्वभूमीवर नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेऊन त्याबाबतचे सादरीकरण टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या केंद्रीय समितीला करण्यात येणार आहे.

त्याकरिता समितीचा पुढील वर्षीचा नियोजित दौरा अलीकडे घेऊन दिवाळीनंतरच समितीला पाचारण करण्यात आले आहे. या समितीपुढे आणि आणि केंद्रीय जल आयोगाकडे खासगी आंतरराष्ट्रीय कंपनीच्या तंत्रज्ञानाबाबत सादरीकरण करण्यात येणार असून त्यांनी मंजुरी दिल्यास खासगी कंपनीच्या मदतीने काम सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवे तंत्रज्ञान काय?

जिओ मेंबरिंग नावाचे हे तंत्रज्ञान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्पी ग्लोबल कॅपिटल कंपनीचे हे तंत्रज्ञान असून या तंत्रात पीयूसी पेपरसारखा प्लास्टिक पेपर बनविण्यात येतो. धरणाच्या ज्या बाजूने गळती आहे, त्याच्या ऊध्र्व बाजूने हा पेपर लावण्यात येतो. त्यानंतर त्यावर स्टील प्लेट लावून नटबोल्टद्वारे त्या कायमस्वरूपी जोडल्या जातात. ही आधुनिक पद्धत असून कंपनीकडून कामाची दहा वर्षांची हमी, तर पंधरा वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. तामिळनाडूमधील कदम पराई या धरणाची गळती या तंत्रज्ञानाने रोखण्यात यश आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button