breaking-newsआंतरराष्टीय

अभिमानास्पद: गीता गोपीनाथ IMF च्या पहिल्या महिला चीफ इकाॅनाॅमिस्ट

गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) मुख्य अर्थतज्ज्ञपदी रूजू झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्वोच्चपदी महिला नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ असून हा मान भारतीय महिलेला मिळालेला आहे. सध्या जागतिकीकरणाला हादरे बसत असून अनेक देश संकुचित विचारसरणीला जवळ करत असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी ही आव्हानात्मक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर गोपीनाथ यांची नियुक्ती महत्त्वाची मानण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही बजावले असून ही मान प्राप्त करणाऱ्या गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत.

मैसूरमध्ये जन्म झालेल्या गोपीनाथ हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर होत्या. तसेच त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत कार्यरत होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं एक ऑक्टोबर रोजी त्यांची नियुक्ती जाहीर करताना गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असल्याचे व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड अनुभव असल्याचे गौरवोद्गार काढले होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये त्यांनी चांगले नेतृत्वगुण दाखवले असून त्या जगभरातील महिलांसाठीही एक आदर्श असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले आहे.

जागतिक अर्थकारणात व व्यापारात डॉलर या चलनाच्या असलेल्या अनभिषिक्त स्थानाचं कारण समजावून घेण्यामध्ये आपल्याला रस असल्याचं गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. जगातल्या विविध देशांचे डॉलरमध्ये होणारे व्यवहार व त्याचा आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर होणारा परिणाम, डॉलरची चणचण भासल्यास आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर होणार परिणाम आदी गोष्टी आपल्या अभ्यासाचे विषय असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अनेक देश एकमेकांशी डॉलरमध्ये व्यवहार करतात व आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरमध्ये कर्ज घेतात. जागतिक व्यवहारामधला डॉलर हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे डॉलरचा या सगळ्या संदर्भात सखोल अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं गोपीनाथ यांनी म्हटलं आहे. जागतिकीकरणापासून लांब जात असलेले देश हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसाठी मुख्य आव्हान असल्याचंही गोपीनाथ यांनी नमूद केलं आहे. जागतिकीकरणासाठी आत्ता असलेली प्रतिकूल परिस्थिती गेल्या 50 – 60 वर्षात आली नव्हती असं सांगताना, ब्रेग्झिटचा संदर्भ देत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अस्थिरता वाढत असल्याचं गोपीनाथ यांनी निदर्शनास आणलं आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button