breaking-newsमहाराष्ट्र

अंगावर आले तर शिंगावर घेऊ; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

केडगावमधील शिवसैनिकाची हत्या व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याचे पाप झाकण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर महापालिकेत भाजपापुढे लोटांगण घातले, असा आरोप शिवसेनेचे स्थानिक नेते आणि माजी आमदार अनिल राठोड यांनी केला आहे. ज्यांनी स्वत:च्या पक्षाला व नेत्यांना फसवले ते शिवसेनेच्या त्रासामुळे भाजपाला पाठिंबा दिल्याचा खुलासा करत आहेत, हे शिवसेनेला बदनाम करण्याचे षडयंत्र असून ते सहन केले जाणार नाही, अंगावर आले तर शिंगावर घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अहमदनगरमध्ये शिवसेनेविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे स्थानिक नेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत भाजपा- राष्ट्रवादी युतीवर टीका केली. राठोड म्हणतात, सत्तेसाठी हपापलेल्या सोयऱ्यांनी अनेक घरात भांडणे लावली, पक्षात फूट पाडली, प्रलोभने दाखवली, बुऱ्हाणनगरमधून सूत्रं हलवणारे भाजपासह सर्व पक्ष चालवत आहेत, मात्र ते सर्व एकच आहेत, हे महापालिका निवडणुकीत समोर आले. सेनेने त्यांचे सर्व मनसुबे उधळून लावले, महापौर निवडणुकीतही आर्थिक तडजोड करुन सत्ता मिळवली, तेच राष्ट्रवादीवाले सेनेला बदनाम करत आहेत, राष्ट्रवादीतील निष्ठावान कार्यकर्तेही त्यांना वैतागले आहेत. त्यांच्या पक्षाचे काम प्रामाणिक करणाऱ्या दादा कळमकर यांनाही त्यांनी अडचणीत आणले, भाजपानेही आपली तत्त्वं सोडून नवा अध्याय सुरु केला आहे, असा आरोप राठोड यांनी केला.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या त्रासामुळे  महापौर निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याचा खुलासा पक्षश्रेष्ठींकडे केला. याचा दाखलाही पत्रकार परिषदेत देण्यात आला. शिवसेनेच्या त्रासामुळे निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सांगतात, मग त्यांनी केवळ पाठिंबा देण्याऐवजी भाजपाच्या चिन्हावरच निवडणूक लढवायची होती, मुख्यमंत्री राष्ट्रवादीने स्वत:हून पाठिंबा दिल्याचे सांगतात, त्याऐवजी त्यांनी सेनेला पाठिंबा देऊन जनादेशाचा आदर का केला नाही, असा टोला शिवसेनेने लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button